Central Bank of India Achalpur शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अचलपूर शाखेत ६ एप्रिलपासून निर्माण झालेल्या कॅश टंचाईमुळे खातेदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सलग तीन दिवसांपासून बँकेत रोख रक्कम उपलब्ध नसल्याने नागरिकांची महत्त्वाची आर्थिक कामे रखडली असून, शहरभर नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेन्शनधारक, शेतकरी, व्यापारी तसेच लहान-मोठ्या व्यवहारांवर अवलंबून असलेले सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या शाखेवर अवलंबून आहेत. मात्र अचानक निर्माण झालेल्या या समस्येमुळे अनेकांना हाताशी पैसे नसताना परत जावे लागत असल्याने ग्राहकांच्या संयमाचा अंत होताना दिसत आहे.
Central Bank of India Achalpur अचलपूर शाखेतून रोज शेकडो आर्थिक व्यवहार पार पडतात. विशेषतः महिन्याच्या सुरुवातीला पेन्शन काढणे, शेतीसाठी खर्च, व्यापार्यांचे देय-घेय यासाठी मोठ्या प्रमाणात कॅशची गरज असते. परंतु सध्या कॅशच उपलब्ध नसल्याने व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामुळे अनेकांची देयके अडकली असून, काहींना वैद्यकीय, शैक्षणिक व इतर तातडीच्या गरजांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहरातील सेंट्रल बँकेच्या एकमेव एटीएममध्ये देखील कधी कॅश असते कधी नसते, अशी स्थिती आहे. एटीएममध्ये पुरेशी रक्कम नसल्याने नागरिकांना पैसे काढता येत नाहीत. काही ग्राहकांनी इतर बँकांच्या एटीएमकडे धाव घेतली, मात्र तेथेही मर्यादित व्यवहारांमुळे समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.
शेतकरी गोपाल राजुरकर म्हणाले की, सोमवारी कॅश काढायला गेलो असता उद्या या असे सांगण्यात आले. मंगळवारी पुन्हा गेल्यावरही कॅश नसल्यामुळे मला परत यावे लागले. दोन दिवसांपासून काम अडले आहे.