एसआयआर मोहीम यशस्वी करावी : जिल्हाधिकारी कुंभेजकर

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
वाशीम जिल्ह्यात मतदार नोंद मॅपिंगला वेग
 
वाशीम, 
छायाचित्र मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करत पूर्वतयारी पूर्ण ठेवणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन Collector Yogesh Kumbhejkar जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या एसआयआर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
 
 
Yogesh Kumbhejkar
 
जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान स्तर प्रतिनिधी (बीएलए) नियुक्ती करण्यासह मतदार नोंद मॅपिंगसाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. बूथस्तर अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक ते सहकार्य करणे, कायमस्वरूपी स्थलांतरित व मयत मतदारांची माहिती अद्ययावत करणे, मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्रांबाबत माहिती देणे तसेच १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. एसआयआर कालावधीत बीएलए मार्फत दररोज १० अर्ज तसेच एकूण ५० अर्ज सादर करता येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.या बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी धनाजी तोरसकर यांनी सादरीकरणाद्वारे मोहिमेची सविस्तर माहिती दिली.
 
 
 
बैठकीस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, नायब तहसीलदार (निवडणूक) एस. एम. पढवे, सहायक महसूल अधिकारी रवि महाले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, वाशीम जिल्ह्यात ऑनलाइन मतदार नोंद मॅपिंग मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत ७६.४७ टक्के नोंदी पूर्ण झाल्या आहेत. एकूण १०,२९,९६१ मतदारांपैकी ४,२०,५२५ मतदारांची नोंद (मॅपिंग) पूर्ण करण्यात आली आहे. अपूर्ण नोंदींमुळे भविष्यात मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शयता असल्याने उर्वरित नागरिकांनी तातडीने मॅपिंग पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
 
Collector Yogesh Kumbhejkar  महिला मतदारांच्या बाबतीत माहेरच्या कुटुंबाशी जोडणी राखणे महत्त्वाचे ठरत असून, नोंदींचे सातत्य राखण्यावर भर दिला जात आहे. तसेच स्थलांतर, विवाहानंतर नावातील बदल आणि नोंदीतील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने ४१ वर्षांवरील मतदारांनी जुन्या नोंदींशी, तर १८ ते ४० वयोगटातील मतदारांनी पालक व आजी-आजोबांच्या नोंदींशी मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. यावेळी अ‍ॅड. संघनायक मोरे (प्रभारी, बसपा), धनंजय रणखांब (वाशीम विधानसभा प्रमुख / जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), कैलास खानजोडे (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी —शरदचंद्र पवार गट) तसेच इतर विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.