नागपूर,
dr chetak panchbhais महाराष्ट्र पशुवैद्यकीय व पशुसंशोधन विज्ञान विद्यापीठ (माफसू) अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. चेतक गुलाबराव पंचभाई यांच्या अभिनव संशोधनाला मोठी दाद मिळाली असून, त्यांनी विकसित केलेल्या ‘पीएच-अवलंबित हर्बल कृमिनाशक गोळी’ला भारत सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे. दिनांक २७ मार्च रोजी पेटंट क्रमांक ५८५५१० अंतर्गत हे पेटंट प्रदान करण्यात आले असून, ते पुढील २० वर्षांसाठी वैध राहणार आहे.
डॉ. पंचभाई यांनी त्यांच्या पीएच.डी. संशोधनावर आधारित ही गोळी विकसित केली आहे. हे संशोधन डॉ. एन. पी. दक्षिणकर, डॉ. निलेश महाजन, डॉ. जी. आर. भोजने आणि डॉ. शिरीष उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. तसेच डॉ. नितीन कुरकुरे आणि डॉ. जयंत कोरडे यांनीही तांत्रिक सहकार्य दिले.
लहान रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये, विशेषतः शेळ्या व मेंढ्यांमध्ये कृमी संसर्ग मोठ्या प्रमाणावर आढळतो. पारंपरिक ऍलोपॅथिक औषधांप्रती वाढलेल्या प्रतिकारक्षमतेमुळे पशुपालकांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आलेली ही ‘पीएच-संवेदनशील’ गोळी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यावर तेथील पीएच पातळीनुसार विरघळते आणि औषधी गुणधर्म सक्रिय करते.
वैद्यकीय चाचण्यांमध्ये या गोळीने शेळ्या व मेंढ्यांमधील तीव्र कृमी संसर्ग कमी करण्यात प्रभावी परिणाम दर्शवले आहेत. स्थानिक औषधी वनस्पतींच्या अर्कांचा वापर हे या संशोधनाचे वैशिष्ट्य ठरले आहे.dr chetak panchbhais या कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन करत, ग्रामीण पशुपालकांसाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.