इंदूर,
I will not say Vande Mataram इंदूर येथील महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘वंदे मातरम’ गाण्यावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून राज्यभरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका रुबिना इक्बाल खान यांनी ‘वंदे मातरम’ गाण्यास नकार देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, त्या राष्ट्रगीतासह इतर गाणी गातात, मात्र कोणत्याही धार्मिक श्रद्धांना धक्का पोहोचेल असे शब्द त्या उच्चारणार नाहीत. आपल्या धर्मानुसार त्या केवळ अल्लाहची उपासना करतात, त्यामुळे ‘वंदे मातरम’मधील अर्थाशी त्या सहमत नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या या भूमिकेमुळे वाद अधिकच तीव्र झाला असून त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांवरूनही मोठी टीका होत आहे. त्यांच्या मतांमुळे राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहेत.दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुमित मिश्रा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी ‘वंदे मातरम’ हे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाशी जोडलेले असल्याचे सांगत त्याचा अवमान सहन केला जाणार नाही, असे ठामपणे म्हटले. तसेच, काँग्रेसने संबंधित नगरसेविकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पक्षाची भूमिका स्पष्ट होईल, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणामुळे दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला असून पुढील काही दिवसांत या वादाला आणखी रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.