इराणची आक्रमक भूमिका;होर्मुझ पुन्हा बंद

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
तेहरान,
Iran's aggressive Hormuz closure होर्मुझच्या सामुद्रधुनी या महत्त्वाच्या सागरी मार्गाबाबत इराणने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर परिस्थिती स्थिर होईल, अशी अपेक्षा असतानाच इराणने पुन्हा एकदा या सामुद्रधुनीवरील नियंत्रण कडक केले आहे. परवानगीशिवाय या मार्गातून जाणाऱ्या जहाजांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देत इराणने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या निर्णयामागे इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
Hormuz closure
दूरगामी परिणाम होणार
विशेषतः लेबनॉनमधील घडामोडींनंतर इराणच्या नौदलाने हालचाली वाढवल्या असून सागरी वाहतुकीवर निर्बंध आणण्यास सुरुवात केली आहे. जहाजमालकांना सतत सूचना देण्यात येत असून या मार्गाने प्रवास करण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा अशा जहाजांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.याचबरोबर, इराणने या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल आणि वायू वाहतुकीवर शुल्क आकारण्याचा विचारही पुढे आणला आहे. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा पुरवठा या मार्गावर अवलंबून असल्याने या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. जगातील सुमारे पाचव्या भागाइतका इंधन पुरवठा या मार्गातून होत असल्याने अनेक देशांची चिंता वाढली आहे.
यापूर्वीही या भागातील संघर्षामुळे सागरी वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक तेलवाहू जहाजे अडकून पडली होती आणि आखाती परिसरात मोठ्या प्रमाणावर जहाजांची गर्दी झाली होती. या परिस्थितीचा परिणाम विविध देशांतील इंधन पुरवठ्यावर झाला होता. भारतालाही त्याचा फटका बसला होता, ज्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाक गॅसच्या उपलब्धतेवर ताण निर्माण झाला होता. सध्याच्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून जागतिक पातळीवर या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.