कंत्राटदाराकडून कामला गती
अमरावती,
Itwara Flyover अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या इतवारा बाजार ते वलगाव रोड येथे जाणार्या अत्यंत महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाच्या प्रगतीचा आढावा काँग्रेस पदाधिकार्यांनी आज घेतला. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रावबहादूर पाटील, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी व उपअभियंता तुषार काळे यांच्या समवेत ९ एप्रिलरोजी या उड्डाणपुलाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व उपस्थित अधिकार्यांनी उड्डाणपुलाच्या सुरु असलेल्या कामाची व कालावधीची संपूर्ण माहिती दिली. या पाहणी प्रसंगी अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Itwara Flyover डॉ. सुनील देशमुख हे आमदार असताना त्यांनी अमरावती शहराच्या पश्चिम भागाला पूर्व भागाशी जोडणार्या या अत्यंत महत्त्वपूर्ण उड्डाणपुलासाठी शासन व केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवून सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर या महत्त्वाच्या उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षे रखडले. त्यामुळे अमरावती शहरातील पश्चिम भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. इतवारा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून दैनंदिन जीवन व व्यावसायिक कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. नागरिकांना होणारा प्रचंड त्रास लक्षात घेऊन माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सार्वजनिक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने वारंवार शासनाला कठोर निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाने ३१ डिसेंबर पूर्वी हा उड्डाणपूल पूर्ण करण्याचे शपथपत्र दाखल केले होते. तरीही काम अपूर्ण राहिल्याने डॉ. देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आजच्या पाहणीत पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेल्या कालावधीत हे काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस शिष्टमंडळाने या बाबत संबंधित अधिकार्यांना जाणीव करून दिली. त्यावर अधिकार्यांनी लवकरात लवकर व तातडीने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.