इस्लामाबाद,
Pakistan's attempt at a ceasefire fails अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने स्वतःची भूमिका मोठी असल्याचा दावा केला आहे. तरी इस्रायलने या दाव्यावर उघडपणे शंका व्यक्त केली आहे. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारतातील इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी पाकिस्तानच्या या भूमिकेला ठाम विरोध दर्शवला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, इस्रायल पाकिस्तानला विश्वासार्ह भागीदार मानत नाही आणि या प्रक्रियेत त्याची भूमिका कितपत प्रभावी आहे याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

पाकिस्तानकडून या शस्त्रसंधीचे श्रेय स्वतःकडे घेतले जात असून, देशाचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी याला त्यांच्या नेतृत्वाचे मोठे यश म्हटले आहे. त्यांच्या मते, या प्रयत्नांमुळे पाकिस्तानची प्रतिमा प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवर एक विश्वासार्ह मध्यस्थ म्हणून उंचावली आहे. त्यांनी असेही नमूद केले की, या प्रक्रियेत विविध देशांनी पाकिस्तानवर विश्वास दाखवला असून पुढील काळात स्थैर्य आणि शांतता टिकून राहील. दरम्यान रुवेन अझर त्यांच्या मते, काही वेळा मोठ्या देशांकडून त्यांच्या स्वतःच्या हितासाठी अशा मध्यस्थांचा वापर केला जातो, परंतु त्यामुळे त्या देशाची विश्वासार्हता सिद्ध होत नाही असे स्पष्ट केले आहे.
राजनैतिक वाद तीव्र होणार
गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यात संदेशवहनाची भूमिका निभावल्याचा दावा केला जात असला, तरी इस्रायलच्या या वक्तव्यामुळे त्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे या शस्त्रसंधीच्या प्रक्रियेत नेमकी कोणाची भूमिका निर्णायक ठरली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकूणच, शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतरही विविध देशांमध्ये मतभेद उघड होत असून या मुद्द्यावरून राजनैतिक वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.