तेहरान,
Possibility of ceasefire cancellation इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला असून त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. युद्धविराम घडवून आणण्यासाठी पाकिस्तानाने पुढाकार घेतला होता. मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. युद्धविरामाच्या प्रस्तावातील महत्त्वाची अट, की लेबनॉनवर कोणताही हल्ला होणार नाही, त्याचे उल्लंघन इस्रायलने केले आहे. युद्धविराम जाहीर झाल्यानंतर ताबडतोब इस्त्रायलकडून लेबनॉनवर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले करण्यात आले. यामुळे इराण प्रचंड संतप्त झाला आहे.
इराणकडून इस्लामाबादमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय परत घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युद्धविरामावरील चर्चेसाठी अमेरिका आणि इराण दोन्ही देशांचे प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये येण्याचे ठरले होते. मात्र लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे इराणकडून सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पाकिस्तानमधील इराणी राजदूत रजा अमीरी मोगदम यांनी युद्धविरामाबाबत केलेली पोस्ट सोशल मीडियावरून हटवली आहे. या पोस्टमध्ये इराणचं शिष्टमंडळ चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये येणार असल्याचे म्हटले होते. आता ही पोस्ट डीलीट झाल्यामुळे शुक्रवारपासून होणाऱ्या चर्चेत इराणचे शिष्टमंडळ उपस्थित राहील की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणने लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे संताप व्यक्त करत युद्धविराम तोडण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर इस्त्रायलने देखील स्पष्ट केले आहे की, लेबनॉनवर होणारे हल्ले थांबवले जाणार नाहीत. जागतिक स्तरावर युद्धाची ही परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर तणाव निर्माण करत आहे.