पुणे
Pune RTO प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) यांनी सन 2025-26 मध्ये अत्यंत दमदार कामगिरी करत 1922 कोटी रुपये महसूल वसूल केला. राज्य शासनाकडून या वर्षासाठी पुणे आरटीओला मोटार वाहन कर व शुल्क वसुलीसाठी 1895.17 कोटींची उद्दिष्टे देण्यात आली होती. या उद्दिष्टांची पूर्तता 101.42 टक्क्यांपर्यंत झाली, ज्यामुळे पुणे आरटीओने आपले लक्ष्य ओलांडले.
यामध्ये रस्ता सुरक्षा अंमलबजावणी पथकांच्या तपासणीत दोषी आढळलेल्या एकूण 16,501 वाहनांना ई-तपासणी अहवालाद्वारे दंड आकारण्यात आला, ज्यातून 25 कोटी 68 लाख रुपये महसूल मिळाला. तसेच कार्यालयाद्वारे एकूण 1,86,824 वाहन चालक परवाने जारी करण्यात आले, ज्यात 5,584 आंतरराष्ट्रीय वाहन परवाने देखील होते.
थकीत करातूनही Pune RTO आरटीओने मोठा महसूल वसूल केला. मोटार वाहनांच्या थकीत करातून 32 कोटी 23 लाख रुपये आणि थकीत पर्यावरण करातून 9 कोटी 80 लाख रुपये मिळाले. ई-लिलावाद्वारे 193 वाहनांच्या विक्रीमधून 1 कोटी 6 लाख रुपये महसूल मिळाला, तर 11 कोटी 18 लाख 844 वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट देण्यात आली.या कालावधीत 3,45,543 नवीन वाहने नोंदविण्यात आली, तर 56,172 पसंती क्रमांक आरक्षित करण्यात आले, ज्यातून 73 कोटी 76 हजार रुपये महसूल मिळाला. याशिवाय, मोटार वाहन कर न भरलेल्या आणि विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 187 वाहनांचा ई-लिलाव केला गेला. यातून पुणे आरटीओला 1 कोटी 1 लाख 89 हजार 346 रुपये महसूल मिळाले, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली आहे.आरटीओच्या या कामगिरीमुळे पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये वाहतूक व्यवस्थापन आणि महसूल वसुलीच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच, ई-तपासणी आणि ई-लिलाव यासारख्या आधुनिक उपाययोजनांमुळे कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी झाली आहे.