कॉपी-पेस्टच्या गोंधळाने शाहबाज शरीफची फजिती

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Shahbaz Sharif's misfortune इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या अधिकृत खात्यावरून प्रसिद्ध झालेल्या एका संदेशामुळे देशातच त्यांची खिल्ली उडवली जात असून सामाजिक माध्यमांवर त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. या घटनेनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की, असा मसुदा थेट अधिकृत खात्यावरून कसा प्रसिद्ध झाला. काही विश्लेषकांनी असा अंदाज व्यक्त केला की, हा मजकूर देशाबाहेर तयार करण्यात आला असावा, कारण त्यातील भाषा आणि शैली नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी होती. या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही.
 
Shahbaz Sharif
 
घडलेल्या प्रकारानुसार, शरीफ यांच्या खात्यावरून एक संदेश प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये स्पष्टपणे तो केवळ मसुदा असल्याचे नमूद केलेले होते. या संदेशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरोधातील कारवाई काही काळासाठी पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले होते. हा संदेश काही वेळातच हटवून त्याच मजकुरात बदल करून पुन्हा प्रसिद्ध करण्यात आला, मात्र तोपर्यंत पहिल्या संदेशाचे चित्र मोठ्या प्रमाणावर पसरले होते.
 
 
 
देशाची प्रतिमा उंचावल्याचा प्रयत्न
दरम्यान, पाकिस्तानकडून या शस्त्रसंधीत आपली भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा केला जात आहे. पंतप्रधान शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी या प्रक्रियेमुळे देशाची प्रतिमा उंचावल्याचे सांगत शांततेसाठी मोठे योगदान दिल्याचा दावा केला आहे. त्यांच्या समर्थकांकडून त्यांना आंतरराष्ट्रीय सन्मानासाठी पुढे करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही दिसत आहे. या सर्व घडामोडींमध्ये इराण-अमेरिका शस्त्रसंधीची स्थिती अजूनही अनिश्चित असून विविध आंतरराष्ट्रीय घटनांमुळे तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने पुढील चर्चांसाठी प्रयत्न सुरू ठेवले असले, तरी सध्याच्या वादामुळे त्यांची विश्वासार्हता प्रश्नचिन्हाखाली आली आहे.