पुणे.
The disintegration of nationalist parties राज्यातील राजकीय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलनीकरणाच्या चर्चेला मोठा वेग मिळाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बैठका सुरू आहेत. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी विलनीकरणाच्या चर्चेऐवजी पक्षाला राज्यात कसे मजबूत करावे, संघटना कशी वाढवावी यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन करावे, तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा, असेही पदाधिकाऱ्यांना सांगितले गेले आहे. मे महिन्यात जिल्हाध्यक्ष आणि नंतर सर्व तालुकाध्यक्षांसाठी शिबिरे आयोजित करण्याची योजना आहे. आजही बलार्ड पीअर येथे पक्षाच्या संघटनात्मक बैठका घेण्यात येणार असून मुंबई विभागाची आढावा बैठक शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहेत. गेल्या आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यातील बैठका घेतल्या गेल्या आहेत. प्रत्येक सेलच्या बैठका सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत चालू आहेत. मुंबईत सेलची बैठक होणार आहे. सक्षम कार्यकर्त्यांची नेमणूक केली जात आहे, तसेच महाराष्ट्रभर दौरे आयोजित केले जातील. राज्यातील मुद्द्यांवर रस्त्यावर आक्रमकतेने भूमिका घेणारा पक्ष म्हणून उभे राहण्याचे उद्दिष्ट आहे. पक्षाच्या मागे आजही कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठबळ आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सातत्यामुळे संघटनेबाबतचे काही निर्णय प्रलंबित होते, पण आता जिल्हा व राज्य पातळीवरील बदलांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रोहित पवार म्हणाले की, अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपावी, यासाठी मी आलो आहे. काँग्रेसकडूनही वरिष्ठांशी चर्चा करून अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथ यांच्याशीही चर्चा केली आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केली. पक्षाच्या वरिष्ठांशी विचार करून याबाबत अंतिम निर्णय कळवण्यात येणार आहे.