छत्रपती संभाजीनगर,
Chhatrapati Sambhajinagar एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आगारातील सहायक वाहतूक निरीक्षकाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
शरद विठ्ठल भिवसने असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. शरद भिवसने यांच्या आत्महत्येनंतर सिल्लोड शहर पोलिसांनी डेपो मॅनेजरसह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे गुन्हा दाखल केला. शरद भिवसने यांनी आयुष्य संपवल्याने एसटी कर्मचारी आणि नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आत्महत्या केलेल्या भिवसने यांच्या नातेवाईंकांनी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. सहकाऱ्याच्या निधनाने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी ४ वाजता सिल्लोड आगारातील बससेवा बंद पाडली होती.
कर्मचाऱ्यांनी बंदChhatrapati Sambhajinagar पुकारल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या २० बस फेऱ्या ठप्प झाल्या होत्या. भिवसने यांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीनुसार, डेपो मॅनेजर विजय काळवणे, वाहतूक निरीक्षक किरण अवसरमल, लिपीक विकास चव्हाण हे भिवसने यांना सतत मानसिक त्रास देत होते. त्यांना शिवीगाळ करून वारंवार बाहेर ड्युटी लावण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. अधिकाऱ्यांच्या याच छळाला कंटाळून आयुष्य संपवल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.