जखमी बिबट तीन तास तडफडला

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
वाहनाने मारली धडक
 
तिवसा, 
Wounded leopard अमरावती—ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा शहरालगत गुरुवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, हा जखमी बिबट्या तब्बल तीन तास घटनास्थळी तडफडत पडून होता.
 
 
bibat
 
माहितीनुसार, सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अमरावतीहून नागपूरकडे वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बिबट्या रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत कोसळला. दरम्यान, सकाळी शेताकडे निघालेल्या काही शेतकर्‍यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ तिवसा वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, बचाव पथक पोहोचण्यास उशीर झाल्याने बिबट्याला सुमारे तीन तास वेदनादायी अवस्थेत तडफडत राहावे लागले. घटना शहराजवळ घडल्यामुळे व जखमी बिबट्या जिवंत असल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला पाहण्यासाठी महामार्गावर गर्दी उसळली. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
 
 
 
Wounded leopard  तिवसा वनविभागाचे वनपाल एस. घोडमारे यांनी घटनेची माहिती मोर्शी - तिवसा क्षेत्राचे आरएफओ अमोल चौधरी यांना दिल्यानंतर अमरावती येथील शिकार प्रतिबंधक पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. अखेर पथक घटनास्थळी दाखल होताच जखमी बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्याचे रेस्क्यू करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला विशेष केंद्रात हलविण्यात आले आहे. याबचाव मोहिमेत वनपाल अमोल गावनेर, महेश धंदर, डॉ. सावंत देशमुख, एम. डी. गवई, ममता डायरे तसेच तिवसा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. परीक्षित कातखेडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय सर्पमित्र अविनाश पांडे, शुभम विघे, प्रवीण ढोबळे व अक्षय माहोरे यांनीही सक्रिय सहकार्य केले.
 
 
तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार
सदर बिबट्या सुमारे पाच फूट लांबीचा, दोन फूट उंचीचा असून अंदाजे बारा महिन्यांचा आहे. त्याच्यावर तज्ज्ञांकडून उपचार सुरू करण्यात येणार आहेत.
-अमोल चौधरी
आरएफओ, मोर्शी-तिवसा