मुंबई
hair damage सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या आणि केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार अनेकांकडून केली जाते. विशेषतः महिलांमध्ये दुतोंडी केसांची समस्या अधिक प्रमाणात आढळून येत असून, यामुळे केसांची गुणवत्ता खालावते आणि केस निस्तेज व निर्जीव दिसू लागतात.
तज्ज्ञांच्या मते, दुतोंडी केस केवळ धूळ, प्रदूषण किंवा सूर्यप्रकाशामुळेच होत नाहीत, तर त्यामागे अनेक अंतर्गत कारणेही असतात. हार्मोनल असंतुलन हे त्यातील एक महत्त्वाचे कारण मानले जाते. थायरॉईड, पीसीओएस किंवा गर्भधारणेदरम्यान होणारे बदल केसांच्या वाढीच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. यामुळे केस कमकुवत होतात, त्यांचा ओलावा कमी होतो आणि केसांची टोके सहज तुटू लागतात.
यासोबतच शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्यासही केसांचे आरोग्य बिघडते. लोह, प्रथिने, बायोटिन, व्हिटॅमिन डी आणि झिंक यांची कमतरता असल्यास केसांची मजबुती कमी होते आणि दुतोंडी केसांची समस्या निर्माण होऊ शकते. अपुरी आहारपद्धती आणि अनियमित जीवनशैली यामुळे ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असते.
डिहायड्रेशनही एक hair damage महत्त्वाचा घटक मानला जातो. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास केसांना आवश्यक ओलावा मिळत नाही, परिणामी केस कोरडे, फ्रिजी आणि कमकुवत होतात. अशा परिस्थितीत केस तुटण्याची शक्यता वाढते. तणावाचाही केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मानसिक तणावामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन केस गळणे आणि तुटणे यासारख्या समस्या निर्माण होतात.दरम्यान, केसांची योग्य काळजी न घेणे आणि चुकीच्या पद्धतीने केस विंचरणेही दुतोंडी केसांना कारणीभूत ठरते. ओले केस अतिशय नाजूक असतात. अशा वेळी जोरात विंचरल्यास केसांवर ताण येऊन ते तुटतात. वारंवार अशी चूक केल्यास केसांची गुणवत्ता आणखी खालावू शकते.
तज्ज्ञांच्या मते, दुतोंडी केसांची समस्या टाळण्यासाठी नियमित केस कापणे, संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि केसांना नैसर्गिक पद्धतीने पोषण देणे आवश्यक आहे. तसेच केमिकलयुक्त उत्पादनांचा अतिरेक टाळून योग्य हेअर केअर पद्धतींचा अवलंब केल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.