वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३ महिला जखमी

    दिनांक :10-May-2026
Total Views |
- देवरी तालुक्यातील घटना
- एका महिलेवर अस्वलाचा हल्ला तर दोघींवर रानडुकराची झडप

गोंदिया, 
animal attacks तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वन्यप्राण्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात तीन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १० मे रोजी सकाळी देवरी तालुक्यातील ओवारा व देवाटोला जंगल परिसरात घडली. वनमाला बोरकर (५५) ओवारा, भुमेश्वरी डोये (४०) डोंगरगाव व हिरणबाई वाढीवे (५४) देवाटोला अशी जखमी महिलांची नावे आहे. या घटनेमुळे तेंदुपत्ता संकलन करणार्‍या मजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
att
 
animal attacks  जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात जंगल परिसरात पत्ता संकलन करण्याकरीता जात असतात. दरम्यान, अर्जुनी मोरगाव तालुक्यात तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाच्या हल्ल्याच्या घटना पुढे येत असताना दुसरीकडे देवरी तालुक्यातही हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना पुढे येऊ लागल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवरी तालुक्यातील ओवारा येथील वनमाला बोरकर आणि डोंगरगाव येथील भुमेश्वरी डोये ह्या तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या असता त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. तर दुसर्‍या घटनेत देवाटोला येथील हिरणबाई वाढीवे या देखील तेंदुपत्ता संकलन करत असताना त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तिन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. वनमाला बोरकर व भुमेश्वरी डोये यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघींना उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हिरणबाई यांचेवर साकरीटोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दिवसेंदिवस वन्यप्राण्याचे हल्ले वाढत असल्याने मजूर आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली असून वनविभागाने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा व जखमींना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.