सोनेगाव आमराई परिसरात स्वच्छता अभियान

    दिनांक :10-May-2026
Total Views |
गतवैभव कायम राखण्याचा नागरिकांचा संकल्प
 
नागपूर, 
'Cleanliness campaign' नागपूर शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणार्‍या आमराई येथील परिसराची स्थानिक नागरिकांनी स्वच्छता करीत गतवैभव कायम राखण्याचा संकल्प करण्यात आला. राजे भोसले काळातील विहीर परिसरात रविवारी स्वच्छता अभियान घेण्यात आले. याप्रसंगी सोनेगाव लगतच्या कॉलणीतील २० नागरिकांनी एकत्रित येत स्वच्छतेचा संदेश दिला. सोनेगाव परिसरातील हनुमान मंदिर, भोसले कालीन विहीर परिसरात दारुच्या बॉटल्स, पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स, सिगारेटचे पॉकेट १० पोते भरून केरकचरा गोळा करण्यात आला. स्वच्छतेचा हा उपक्रम दररविवारी कायम राखण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.

sonegaon 
 
आमराईला नवसंजीवनी मिळणार
निसर्गरम्य सोनेगाव हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता राखल्यास हा परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत होणार आहे. भोसले काळातील विहीर ३०० वर्षे जुनी असून सोनेगाव आमराईला नवसंजीवनी मिळणार असल्याची सचिन द्रवेकर यांनी दिली आहे.

आमराई परिसराचे नुकसान
'Cleanliness campaign'  मुख्यत: सोनेगाव परिसरातील नागरिक निसर्ग रम्य परिसरात तसेच मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने विविध कार्यक्रम साजरे करतात. महाविद्यालयातील विद्यार्थी वाढदिवस साजरे केल्यानंतर केरकचरा तेथे ठेवून मोकळे होतात. यामुळे आमराई परिसराचे नुकसान होत आहे. असामाजिक तत्वांचा वावर येथे वाढला असून भर दुपारी आणि मद्यप्राशन करणारे वाढले आहे. केरकचरा परिसरात वाढल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यानंतर मनपा लक्ष्मीनगर झोनच्या कचरा संकलन करणार्‍या कर्मचार्‍यांची मदत नागरिकांना मिळणार आहे.

शिवानी दाणी यांच्याकडून पाहणी दौरा
सोनेगाव परिसरात पुन्हा नव्याने आंब्याची झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.नव्या विविध झाडांमुळे आमराईचे गत वैभव कायम राखता येणार आहे. महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी यांनी मनपाच्या लक्ष्मीनगर झोनच्या अधिकार्‍यांसोबत विहिरीला भेट दिली तसेच हनुमान मंदिर परिसराची पाहणी केली होती. यानंतर हेरिटेज कमिटीच्या मान्यतेनंतर विहीरीची स्वच्छता होणार आहे.