समृद्धी महामार्गावरून १.३१ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त

    दिनांक :10-May-2026
Total Views |
रस्ते महामार्ग पोलिसांची धडक कारवाई
 
कारंजा लाड, 
Confiscation of prohibited Gutkha समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी १० मे एकही मोठी धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ३१ लाख ५१ हजार २५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.
 
 
gutakha
 
Confiscation of prohibited Gutkha  मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील कारंजा टोल नाका येथे महामार्ग पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू होती. यावेळी महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार व पोलीस अंमलदार यांनी संशयित आयशर वाहन क्रमांक एमएच ४० सीटी २९६४ थांबवून तपासणी केली.वाहनाची तपासणी करताना ट्रकमधून गोडसर वास येत असल्याने पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली. त्यावेळी वाहनामध्ये तंबाखूसदृश्य पदार्थ असल्याचे आढळून आले. संबंधित माल अमरावती येथील जावेद नामक व्यक्तीचा असल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिली. संशय अधिक बळावल्याने पोलिस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार यांनी तात्काळ ही माहिती महामार्ग पोलीस विभाग वाशीमचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार दांदडे यांना दिली. यानंतर दांदडे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देऊन सदर वाहन कारंजा शहर पोलिस ठाण्यात ताब्यात ठेवण्याचे निर्देश दिले. पुढील तपासासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला पाचारण करण्यात आले.
 
 
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले.या कारवाई दरम्यान वाहनातील प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू तसेच आयशर वाहन असा एकूण १ कोटी ३१ लाख ५१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार यांच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार दांदडे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णकन्हैया पवार, पोहेकॉ अमोल इंगोले व पोकॉ आनंद काकडे यांनी पार पाडली.