अमरावतीत चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू

    दिनांक :10-May-2026
Total Views |
महाजनपुरा परिसरात शोककळा
 
अमरावती, 
Death by drowning in a lake शहरा लगतच्या मार्डी रोडवरील डॉ. राजेंद्र गोडे महाविद्यालय परिसरामागील तलावात बुडून चार अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये भाऊ-बहिणीचाही समावेश आहे. हे चौघेही महाजनपुरा भागतील रहिवाशी आहेत. माहितीनुसार, काही मुले - मुली रविवारी दुपारी तलाव परिसरात पिकनिक आणि जेवणासाठी गेले होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सोनाली नरेंद्र जोशी (१६) ही फोटो काढण्यासाठी तलावात उतरली. यावेळी ती पाण्यात बुडू लागल्याचे दिसताच तिचा भाऊ आदित्य नरेंद्र जोशी (१२) तिच्या मदतीसाठी तलावात उतरला. तोही बुडत असल्याचे दिसताच पायल बबलू पंडित (१४) आणि यश गजानन काकणे (१३) या दोघांनी त्यांना वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली. त्यांना बाहेर येतो आले नाही. तलावातील खोल चिखलात चौघेही अडकले आणि पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून स्थानिक नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली.
 
 
lake
 
Death by drowning in a lake  माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रोशन शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच जिल्हा आपत्ती निवारण व बचाव पथकालाही तातडीने पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर तलावातून चौघांना बाहेर काढले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी इर्विन रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे महाजनपुरा परिसरासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरावर शोककळा पसरली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खोलापुरी गेट पोलिस स्टेशन येथील पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.