दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’

महिलेकडून सायबर गुन्हेगाराने उकळले 30.50 लाख

    दिनांक :10-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
digital arrest scam पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी निधी जमा केल्याचा आराेप करत सायबर गुन्हेगारांनी एका महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ केले. तिच्याकडून लाखाे रुपये उकळून फसवणूक केली. या प्रकरणी शुक्रवारी सायबर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माेबाईल क्रमांक व बँक खात्यांच्या वापरकर्त्यांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.
 

digital arrest scam, cyber fraud Nagpur, Pahalgam terror attack funding scam, 
पीडित महिला (वय 60) या दक्षिणामूर्ती चाैक परिसरातील रहिवासी आहेत. 18 एप्रिल 2026 राेजी दुपारी एका सायबर गुन्हेगाराने स्वतःला लखनऊ एटीएस पथकातील अधिकारी संदीप राव असल्याचे सांगत त्यांना फोन केला. त्यांच्या नावाने मुंबईतील आयसीआयसीआय बँकेत खाते असून त्या खात्यातून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासाठी आर्थिक निधी पाठविण्यात आल्याचे सांगून महिलेला घाबरविण्यात आले. हे प्रकरण मनी लाॅन्ड्रिंगशी संबंधित असल्याचे सांगत तिच्यावर कायदेशीर कारवाई हाेणार असल्याची धमकी देण्यात आली. तिला घरातच ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. प्रकरण मिटवण्यासाठी लाखाे रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनाही चाैकशीच्या कक्षेत आणण्याची धमकी देण्यात आली. याबाबत काेणालाही माहिती देऊ नये, अशी ताकीदही आराेपीने दिली हाेती.
 
 
तब्बल सहा दिवस डिजीटल अरेस्ट
सायबर गुन्हेगारांनी दबाव टाकून 18 ते 24 एप्रिलदरम्यान महिलेला डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले. या काळात तिच्या व्हाॅट्सअ‍ॅपवर बनावट वाॅरंट आणि इतर कागदपत्रे पाठविण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने आराेपीने सांगितलेल्या बँक खात्यात 30 लाख 50 हजार रुपये जमा केले.
 
 
रक्कम दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव महिलेला झाली. त्यानंतर हे प्रकरण पाेलिसांपर्यंत पाेहाेचले. प्राथमिक चाैकशीत फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.a