तेहरान,
fifa-world-cup-2026 : येत्या २०२६ च्या फिफा विश्वचषकाबाबत गेल्या काही दिवसांपासून इराणच्या सहभागावर अनिश्चिततेचे ढग होते, परंतु आता इराण फुटबॉल महासंघाने सर्व शंका दूर करत संघ सहभागी होणार असल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ११ जून ते १९ जुलै दरम्यान रंगणाऱ्या या महाकुंभात इराणने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर थेट स्थान मिळवले आहे. मात्र, या सहभागासोबतच इराणने यजमान देशांसमोर सुरक्षेपासून ते इमिग्रेशनपर्यंतच्या तब्बल १० कडक अटी ठेवल्या आहेत, ज्यामुळे क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

इराण फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष मेहदी ताज यांनी स्पष्ट केले आहे की, इराणचा संघ मैदानात उतरण्यास सज्ज आहे, परंतु यजमान देशांनी इराणच्या खेळाडू, प्रशिक्षक, पत्रकार आणि समर्थकांसाठी व्हिसा प्रक्रिया अत्यंत सुलभ करावी. विशेषतः स्टार खेळाडू मेहदी तारेमी आणि एहसान हजसाफी यांच्यासह संपूर्ण ताफ्याला विमानतळावर कोणत्याही अतिरिक्त तपासणीचा किंवा इमिग्रेशनचा त्रास होऊ नये, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. याव्यतिरिक्त, संघाने विमानतळ ते हॉटेल आणि स्टेडियमपर्यंतच्या प्रवासासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची अटही घातली आहे.
इराणने केवळ खेळापुरत्याच नाही, तर काही प्रतीकात्मक अटीही मांडल्या आहेत. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये केवळ प्रतिस्पर्धी संघांचे अधिकृत राष्ट्रध्वजच असावेत आणि राष्ट्रगीत कोणत्याही व्यत्ययाशिवाय वाजवले जावे, असा इराणचा आग्रह आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सामन्यानंतर होणाऱ्या पत्रकार परिषदांमध्ये खेळाडू किंवा प्रशिक्षकांना केवळ फुटबॉलशी संबंधित प्रश्न विचारले जावेत आणि कोणताही राजकीय किंवा बाह्य मुद्दा उपस्थित केला जाऊ नये, असे इराणने निक्षून सांगितले आहे. कोणत्याही बाह्य शक्तीला आम्हाला स्पर्धेपासून रोखता येणार नाही, असा ठाम विश्वासही इराणने व्यक्त केला आहे.
या स्पर्धेत इराणचा समावेश गट 'जी' मध्ये करण्यात आला असून त्यांच्यासोबत न्यूझीलंड, बेल्जियम आणि इजिप्त हे संघ आहेत. इराणचा पहिला सामना १५ जून रोजी लॉस एंजेलिसमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणार असून त्यानंतर २१ जूनला बेल्जियम आणि २६ जूनला सिएटलमध्ये इजिप्तशी त्यांची लढत होईल. आता स्पर्धा सुरू व्हायला महिनाभराचाच कालावधी उरलेला असताना, अमेरिका आणि इतर यजमान देश इराणच्या या अटींना कसा प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.