नगरसेवक डॉ. मोहंमद नदीम : पत्रपरिषदेत केली मागणी
पुसद,
Illegal sale of public space case येथील गांधीनगर लेआऊटमधील सार्वजनिक खुल्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून ती विक्री केल्याचा आरोप नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष अनिता मनोहर नाईक यांच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी निष्पक्ष व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. मोहम्मद नदीम यांनी पत्रकार परिषदेत केली. पुढे बोलताना नगरसेवक डॉ. नदीम म्हणाले की, 1969 साली गांधीनगर लेआऊट तयार करण्यात आले होते. त्या लेआऊटमधील खुल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून, सुमारे 4500 चौरस फूट जागा अनिता नाईक यांनी स्वतःच्या नावावर करून घेत तिची विक्री केल्याचा आरोप आहे. संबंधित जागेची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे 4 कोटी 50 लाख रुपये असल्याचेही सांगण्यात आले.
ही जागा अनिता नाईक यांच्या नावावर नेमकी कशाच्या आधारे झाली, याबाबत मूळ दस्तऐवजांमध्ये कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याचा दावा करण्यात आला. तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मालकी हक्क मिळविण्यात आला असून, त्यांच्याकडे मालकी हक्काचा ठोस पुरावा नसल्याचेही या पत्रपरिषदेत नमूद करण्यात आले. या जागेबाबत कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेनुसार फेरफार करण्यात आलेला नसल्याचे दिसून येत असून, महसूल विभागाच्या नोंदींमध्येही संबंधित जागेबाबत कोणतेही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती अधिकाèयांनी दिल्याचा दावा डॉ. नदीम यांनी केला.
Illegal sale of public space case सत्तेचा व अधिकारांचा गैरवापर करून ही जागा विक्री करण्यात आल्याचा आरोप करत, शासनाची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी 5 मे 2025 रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. पोलिसांनी कोणत्याही दबावाखाली न येता नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे डॉ. मोहम्मद नदीम यांनी केली आहे. यावेळी पत्रपरिषदेत काँग्रेसचे पुसद शहराध्यक्ष झिया शेख, नगरसेवक अॅड. वसीम अहेमद, नगरसेवक जब्बार लाखे, तहेसीन अहेमद, मसूद मिर्झा, गाझी ओसामा, इर्शाद कुरेशी, फिरोज खान प्रामुख्याने उपस्थित होते.
पाठपुरावा सुरूच
गांधीनगर येथील लेआऊटमधील 30 फुटांचा सार्वजनिक रस्ता व 23 हजार चौरस फूट खुल्या जागेवर नाईक कुटुंबियांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुमारे 15 कोटी रुपयांच्या या सार्वजनिक जागेवर सत्तेचा दुरुपयोग करून अनधिकृत ताबा मिळविण्यात आल्याचा दावा करण्यात आला. हे अतिक्रमण हटवून ही जागा नगर परिषदेने ताब्यात घ्यावी, अशी मागणी मुख्याधिकारी व नगर परिषद अध्यक्ष व अनिता नाईक यांची सून मोहिनी नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान गांधीनगरमधील सार्वजनिक जागेवरील बांधकामाला तत्कालीन मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांनी 2023 मध्ये परवानगी दिली. चुकीची कागदपत्रे असूनही परवानगी कायम ठेवण्यात आली. या प्रकरणी जिल्हाधिकाèयांकडे तक्रार करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.