*11 किलो गांजासह 2 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त
* स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर,
Interstate marijuana smuggling चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली असून, ओडिशातून गांजा आणून विक्री करणार्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत 3 महिला आणि 2 पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 11 किलो गांजा, ऑटो आणि मोबाईलसह एकूण 2 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काही महिला ओडिशा राज्यातून गांजा घेऊन येत आहेत आणि बल्लारपूर येथील पुरुष सहकार्यांसह ऑटोने राजुरा येथे विक्रीसाठी जात आहेत अशा माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर-राजुरा-सास्ती मार्गावर सापळा रचून संशयास्पद ऑटो क्रमांक एमएच 34, बिएच 1626 थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये बसलेल्या महिलांच्या पिशव्यांमध्ये 11 किलो अवैध गांजा आढळून आला. या प्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून गुन्हयात 11 किलो गांजा, एक ऑटो, मोबाईल संच असा एकूण किंमत 2 लाख 22 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
Interstate marijuana smuggling या गुन्ह्यात ऑटो चालक मोहम्मद युनुस अली उर्फ बादशाह, लालचंद गणेश केसकर, उमा हामु नुनावत (50, रा. मुळगु, जि. वरंगल, तेलंगणा), ललिता आकाश दामले (24, रा. ईटारसी, मध्यप्रदेश), आरती गुलाब परते (28, रा. भोपाळ, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात ओडिशातील मुनीगडा येथील मुख्य पुरवठादार इंद्रजित पाराससेठ आणि रामबाबू यांची नावे निष्पन्न झाली आहेत. प्रकरणाचा पुढील तपास बल्लारशा पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकार, पोलिस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, स्वामी चालेकर, पोलिस हवालदार किशोर वैरागडे, अजय बागेसर, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर आदींनी केली.