उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दौर्‍यात जाफराबादच्या समस्या चर्चेत

    दिनांक :10-May-2026
Total Views |
रंगय्यापल्ली, 
सिरोंचा तालुक्यातील Jafrabad Gram Panchayat जाफराबाद ग्रामपंचायतीमधील विविध प्रलंबित समस्या, कथित अनियमितता व विकासकामांबाबत ग्रामस्थांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पृष्ठभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकपा) वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून समस्या अवगत करण्यात आल्या. ग्रामपंचायत जाफराबाद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी भेट दिली असता ग्रामस्थांच्या विविध समस्या व मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनियमितता, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा, विकासकामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव तसेच ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
 

narote
 
Jafrabad Gram Panchayat  अनेक विकासकामे अपूर्ण अवस्थेत असून काही कामे केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा येत्या काही दिवसांत ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाकपाच्या वतीने देण्यात आला. या निवेदनामुळे प्रशासनाचे लक्ष जाफराबाद ग्रामपंचायतीतील प्रश्‍नाकडे वेधले गेले असून पुढील कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.