यंदा पाऊस कमी; तरीही शेतकरी मालामाल होणार

    दिनांक :10-May-2026
Total Views |
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे भाकीत
 
कारंजा लाड, 
यंदाच्या वर्षात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शयता असली, तरी योग्य नियोजन, पिकांची फेरपालट आणि वेळेवर शेती व्यवस्थापन केल्यास शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होणार असून २०२६ हे वर्ष शेतकर्‍यांसाठी ’ मालामाल’ करणारे ठरेल, असा विश्वास Meteorologist Punjabrao Dakh हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
 
 
dakh
 
लोकनेते माजी आमदार स्व. प्रकाश डहाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा यांच्या वतीने १० मे रोजी यार्ड क्रमांक १ येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पंजाबराव डख म्हणाले की, वाढत्या खर्चामुळे शेती परवडत नसली तरी विदर्भातील शेतकरी सातत्याने पिकांची फेरपालट करत असल्याने येथील शेती टिकून राहणार आहे. शेतीसोबत जोडधंदा असणे ही काळाची गरज असून, स्थानिक हवामान व जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पिकांची निवड करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, १५ मेपासून वातावरणात बदल होण्याची शयता असून शेतकर्‍यांनी आतापासूनच पेरणीची तयारी सुरू करावी. लवकर येणार्‍या वाणांची निवड फायदेशीर ठरेल. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस जोरदार होण्याची शयता असल्याने त्याचा शेतीवर परिणाम होऊ शकतो. अवकाळी पावसापासून संरक्षणासाठी पेरणीची तारीख नोंदवून ठेवावी तसेच पीक काढणी योग्य वेळी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.’ निसर्गाला घाबरू नका, निसर्गाचा अंदाज घेणे शिका,’ असे सांगत त्यांनी झाडे, पक्षी आणि जनावरेही पावसाचे संकेत देतात, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष वेधले.कार्यशाळेत करडा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. निवृत्ती पाटील यांनीही शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. घरातील गायींची संख्या कमी झाल्यापासून शेतीची अधोगती सुरू झाली असून शेणखताचा वापर घटल्याने जमिनीची सुपीकता कमी झाली, असे त्यांनी सांगितले. रासायनिक शेतीमुळे पिकांची प्रतिकारशक्ती घटली असून दोन दिवस पाणी न मिळाल्यास सोयाबीनसारखी पिके लगेच कोमेजतात, असेही त्यांनी नमूद केले. ‘गो कृपा अमृत शेती’ पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होत असल्याचा दावा करत त्यांनी हळद व संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना या पद्धतीचा प्रयोग करण्याचे आवाहन केले. आगामी हंगामात किमान पाच गुंठे क्षेत्रात तरी ‘गो कृपा अमृत शेती’चा प्रयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
 
 
Meteorologist Punjabrao Dakh  कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात माजी आमदार स्व. प्रकाश डहाके यांना आदरांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी भाजपाचे मुख्य प्रतोद आ. रणधीर सावरकर होते. यावेळी उद्घाटक म्हणून खा. अनुप धोत्रे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार अनंतराव देशमुख, आ. सई डहाके, आ. श्याम खोडे, माजी आ. विजय जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, जिल्हा सरचिटणीस डॉ. राजीव काळे, वाशीम नगराध्यक्ष अनिल केंदळे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शाह, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विश्वनाथ ताथोड, गटनेत्या शालिनी ठाकरे, नगरसेवक सागर अंभोरे, अतुल चिमेगावे, नगरसेविका वैशाली गुल्हाने, कांचन डेंडूळे, ज्योती राठोड, वंदना धार्डीकर, कुसुम अघम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. प्रकाश डहाके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी खासदार देशमुख, आमदार जाधव, आमदार खोडे, खासदार अनुपधोत्रे आद मान्यवरांनी माजी आ. स्व.प्रकाश डहाके यांच्या संबंधीच्या आठवणींना उजाळा दिला.
 
 
अध्यक्षीय भाषणात आ. रणधीर सावरकर यांनी पीक विमा कंपन्यांच्या गैरप्रकारांना आळा घालून शेतकरी हितासाठी निधी वापरण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच शेतीत विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचे धोरण शासनाने ठरविले असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक बाजार समितीचे उपसभापती प्रकाश लिंगाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण कानकिरड तर आभार प्रदर्शन सचिव निलेश भाकरे यांनी केले. कार्यशाळेला कारंजा तालुयासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बाजार समितीकडून शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले आणि कृषी विभागामार्फत ट्रॅटर वाटपही करण्यात आले.