गडचिरोली,
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'Mogra Phulla' music concert ‘मोगरा फुलला’ या सांगीतिक मैफलीला गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित या कार्यक्रमात संत साहित्य, समाजप्रबोधन आणि आधुनिक जीवनमूल्यांचा प्रभावी संगम अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमास गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उपकुलगुरू डॉ. श्रीराम कवाळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, व्याख्याते व निरुपणकार गणेश शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश त्रिनगरीवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी संत साहित्य हे विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. संत साहित्य नव्या विचारांना चालना देणारे असून विद्यार्थ्यांचा त्याकडे ओढा असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
'Mogra Phulla' music concert यावेळी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासन आणि विशेषतः आशीष शेलार यांचे आभार मानले. गडचिरोली शहरात तसेच विद्यापीठाच्या प्रांगणात अशा नावीन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कौतुक केले. या कार्यक्रमात व्याख्याते व निरुपणकार गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रातील विविध प्रसंग प्रभावी शैलीत मांडले. निरुपण करताना त्यांनी निसर्ग, समाज, अर्थकारण आणि आधुनिक जीवनातील विविध प्रश्नांना स्पर्श केला. गडचिरोलीचे चित्र आता सकारात्मक दिशेने बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले. संत साहित्य हे शांततेच्या मार्गाने परिवर्तन घडवणारे विचार देणारे असल्याचे सांगताना त्यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संतविचाराचा उल्लेख केला. भौतिक प्रगती आवश्यक असली तरी निसर्गाचा समतोल आणि पर्यावरणाचा आदर राखणे तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोजगारनिर्मितीसाठी विकास आवश्यक असला तरी निसर्गाची आबाळ होणार नाही, याची काळजी घेत प्रगतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. हा संदेश संपूर्ण जगाने आत्मसात करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमातून संत साहित्याचा आधुनिक संदर्भात विचार मांडत सांस्कृतिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सविता गोविंदवार यांनी केले. कार्यक्रमासाठी आशुतोष कोरडे, सतीश पडोळे आदींनी सहकार्य केले.