विदर्भची नागपूरातून ‘वारी’ गोंदियाकरांच्या ‘जिव्हारी’

    दिनांक :10-May-2026
Total Views |
- प्रवाशांचे बेहाल;आणखी १३ दिवसांची प्रतीक्षा!

प्रमोदकुमार नागनाथे
गोंदिया, 
विदर्भवासीयांची विशेषतः गोंदिया जिल्ह्याची ‘लाईफलाईन’ समजली जाणारी रेल्वेगाडी क्रमांक १२१०५/१२१०६ सीएसएमटी Mumbai Vidarbha Express मुंबई-गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस काही दिवसांपासून गोंदियाऐवजी नागपूर स्थानकावरून धावत आहे. तर येत्या २३ मेपर्यंत असेच चित्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या रेल्वेगाडीने प्रवास करणार्‍या गोंदिया ते नागपूरदरम्यानच्या सर्व रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांचे बेहाल होत असून विदर्भ एक्स्प्रेसची नागपूरातून सुरू असलेली वारी सद्या या प्रवाशांच्या विशेषतः गोंदियाकरांच्या जिव्हारी लागत आहे.
 
 
Mumbai Vidarbha Express
 
Mumbai Vidarbha Express  दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया स्थानकावर रेल्वे ट्रॅक नूतनीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे प्रवाशांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल झाला आहे. मुंबईहून सुटणारी रेल्वेगाडी क्रमांक १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा प्रवास नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात आला आहे. त्यातच परतीच्या प्रवासातही रेल्वेगाडी क्रमांक १२१०६ गोंदिया-मुंबई गोंदियाऐवजी नागपूर स्थानकावरूनच मुंबईसाठी रवाना होत आहे. रेल्वे मार्गाचे नूतनीकरण, इंटरलॉकिंग, प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि नवीन मार्गांची जोडणी यासारखी तांत्रिक कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने हा ब्लॉक घेतला आहे. असे असले तरी ऐन लग्नसराईच्या हंगामात रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय प्रवाशांसाठी त्रासदायक ठरला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित कालावधीत काही गाड्यांना पर्यायी थांबे देण्यात आले असताना प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत अ‍ॅप किंवा संकेतस्थळावर वेळापत्रकाची खात्री करूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन केले आहे. असे असले तरी या गाडीचे थांबे असलेल्या गोंदियासह तिरोडा, तुमसर, भंडारा स्थानकावरून दरदिवशी प्रवास करणार्‍या व्यवसायीकांसह शासकीय, निमशासकीय नोकरदारवर्ग, विद्यार्थी आदी शेकडो नागरिकांची फजिती होत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
विदर्भवीरांच्या फजितीची चर्चा...
मुंबईहून गोंदियाच्या दिशेने येणारी ही रेल्वेगाडी नागपूर स्थानकावरून सकाळी ९ वाजता सोडण्यात येत असून दुपारी २.३० वाजता गोंदिया स्थानकावरून परत मुंबईसाठी रवाना होते. त्यामुळे भंडारा, तुमसर, तिरोडा येथील गोंदियातील शासकीय कार्यालयात कार्यरत काही कर्मचारी कार्यालयीन वेळेला बुट्टी मारून याच रेल्वेगाडीने अपडाऊन करत असल्याचे बोलले जात असताना सद्या या गाडीची सेवा नागपूरापर्यंतच मर्यादीत झाल्याने त्या विदर्भवीरांची फजिती होत असल्याच्या चर्चा होत आहेत.