राजकारण बाजूला, माणुसकी पहिले! मोदींच्या संवेदनशीलतेने जिंकली सर्वांची मने

    दिनांक :10-May-2026
Total Views |
हैदराबाद,
pm-modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबादमध्ये आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत एका लग्नासाठी आपल्या सुरक्षेचा आणि हेलिकॉप्टर लँडिंगचा नियोजित प्लॅन शेवटच्या क्षणी बदलला. ज्या ठिकाणी पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, नेमक्या त्याच ठिकाणी बीआरएसचे आमदार कोटी रेड्डी यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडणार होता. या सोहळ्यासाठी ५,००० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, पंतप्रधानांच्या आगमनामुळे पाहुण्यांची गैरसोय होऊ शकते, ही बाब लक्षात येताच मोदींनी १८ किलोमीटरचे अंतर रस्ते मार्गाने पार करण्याचा निर्णय घेतला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामान्य जनतेची गैरसोय टाळणाऱ्या पंतप्रधानांच्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
modi 
 
 
या दौऱ्यात पंतप्रधानांनी तेलंगणाला ९,४०० कोटी रुपयांच्या विकासकामांची मोठी भेट दिली. हैदराबाद आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात (HICC) आयोजित कार्यक्रमात त्यांनी डिजिटल माध्यमातून विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये प्रामुख्याने हैदराबाद-पणजी इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग-१६७ चे चौपदरीकरण, रेल्वेची काजीपेट-विजयवाडा मल्टी-ट्रॅकिंग परियोजना आणि हैदराबादमधील नवीन पेट्रोलियम टर्मिनलचा समावेश आहे.
 
याप्रसंगी तेलंगणाचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ल, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे, वारंगल येथील १७०० कोटींच्या काकतीय मेगा टेक्सटाइल पार्कचेही (PM मित्र पार्क) उद्घाटन यावेळी करण्यात आले. हे देशातील पहिले पूर्णपणे कार्यान्वित झालेले पीएम मित्र पार्क ठरले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे तेलंगणाच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.