आयुर्वेद योग केंद्राची जनजागृती
यवतमाळ : सध्या तापमानात मोठी वाढ होत असून Risk of heatstroke उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सामका आयुर्वेद योग वेलनेस सेंटर, गोधनी बायपास, यवतमाळ यांच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. उष्माघात हा शरीरातील उष्णता संतुलन बिघडल्यामुळे होणारा गंभीर आजार आहे.
उष्माघात टाळण्यासाठी दुपारी 11 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, बाहेर जाताना डोक्यावर टोपी, गॉगल किंवा ओढणीचा वापर करावा, सैल, हलके व सुती कपडे वापरावे, भरपूर पाणी प्यावे, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांचा आहारात समावेश करावा, उन्हात उपाशी जाणे टाळावे, जड व तळलेले पदार्थ टाळावे, वाहनात लहान मुले किंवा वृद्धांना एकटे सोडू नये. उष्माघाताची लक्षणे : चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी व मळमळ, त्वचा कोरडी व गरम होणे, शरीराचे तापमान वाढणे, बेशुद्धावस्था (गंभीर स्थितीत) अशी लक्षणे दिसल्यास त्वरित थंड ठिकाणी नेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत.
Risk of heatstroke आयुर्वेदिक घरगुती उपाय : आयुर्वेदानुसार पित्तदोष वाढल्यामुळे उष्माघात होतो. त्यामुळे खालील उपाय उपयुक्त ठरतात. धन्यक (कोथिंबीर) पाणी शरीरातील उष्णता कमी करते. आवळा सरबत थंडावा देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवते. गुलकंद पित्तशामक व शरीराला थंड ठेवणारे बेल सरबत (बेलफळ) उष्णतेपासून संरक्षण करते. ताक पचन सुधारते व शरीर शीतल ठेवते. सोप पाणी डोळे व मेंदूला थंडावा देते. नारळपाणी इलेक्ट्रोलाईट संतुलन राखते. कडूनिंब व पुदिन्याचा वापर शरीरशुद्धी व शीतलता वाढवतो. सकाळी लवकर उठून प्राणायाम, ध्यान व हलका योगाभ्यास केल्यास शरीर उष्णतेशी लढण्यास सक्षम राहते. उन्हाळ्याच्या काळात आयुर्वेदिक दिनचर्या व साधे घरगुती उपाय अवलंबून आपण उष्माघातासारख्या गंभीर समस्यांपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करू शकतो. योग्य काळजी घेतल्यास उन्हाळ्याचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, अशी माहिती वैद्य पंकज पवार यांनी दिली.