मुंबई,
shrikant-shinde-statewide-tour : येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली कंबर कसली असून, संघटनात्मक बांधणीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना संसदीय गटनेते आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे १६ मे २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. हा राज्यव्यापी दौरा १५ जुलैपर्यंत तब्बल दोन महिने चालणार असून, यादरम्यान ते राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांना भेट देऊन पक्ष संघटना अधिक सक्षम करणार आहेत.

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी मुंबई आणि ठाणे परिसरातील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून, आता ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार आहेत. या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या सभा टाळून प्रत्यक्ष भेटींवर आणि संवादावर अधिक भर दिला जाणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे ६५ ते ७० मतदारसंघांचा दौरा करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती, ज्याचा फायदा निवडणूक रणनीती आखताना झाला होता.
या आगामी दौऱ्यात प्रामुख्याने बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती आणि शिवसेनेच्या विविध आघाड्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. विशेषतः बीएलए (BLA) आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे. बैठकांमध्ये जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील. प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
दौऱ्याच्या नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यात मे महिन्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांत बैठका होतील. दुसऱ्या टप्प्यात जून महिन्यात जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे संवाद दौरा होईल. शेवटच्या टप्प्यात जुलै महिन्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा आढावा घेऊन या महादौऱ्याची सांगता होणार आहे.