युद्ध मिटणार, जग हसणार; शांततेसाठी पुतिन पाऊल उचलणार!

    दिनांक :10-May-2026
Total Views |
मॉस्को,
russia-ukraine-war : गेल्या चार वर्षांहून अधिक काळ चाललेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक संकेत दिला आहे. शनिवारी 'विक्टरी डे' परेडनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुतिन यांनी स्पष्ट केले की, युक्रेनसोबतचे युद्ध कायमचे संपवण्यासाठी ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची रशियाबाहेर म्हणजेच एखाद्या तिसऱ्या देशात भेट घेण्यास तयार आहेत. रशियाच्या बाहेर भेट होण्याची शक्यता पुतिन यांनी प्रथमच व्यक्त केल्याने जागतिक राजकारणात याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
 

war 
 
मात्र, या ऐतिहासिक भेटीसाठी पुतिन यांनी एक महत्त्वाची अट घातली आहे. त्यांच्या मते, ही भेट केवळ चर्चा करण्यासाठी नसावी, तर ती दोन्ही देशांमधील पूर्ण आणि दीर्घकालीन शांतता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी असावी. म्हणजेच, दोन्ही देशांमधील तज्ज्ञांनी आधीच सर्व मुद्द्यांवर चर्चा करून तोडगा काढलेला असावा आणि राष्ट्राध्यक्षांची भेट ही केवळ या करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठीचा अंतिम टप्पा असावा. २०१४ आणि २०१५ मधील 'मिन्स्क करारां'चा दाखला देत पुतिन म्हणाले की, तासनतास चालणाऱ्या अशा चर्चांमधून ठोस निष्पन्न काहीच होत नाही, त्यामुळे यावेळी सर्व गोष्टी आधीच निश्चित असाव्यात.
 
फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झालेले हे भीषण युद्ध आता पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्येही पुतिन यांनी चीन दौऱ्यानंतर झेलेन्स्की यांची भेट घेण्याची तयारी दर्शवली होती, मात्र तेव्हा त्यांनी मॉस्कोचे ठिकाण सुचवले होते. आता रशियाच्या बाहेर इतर कोणत्याही देशात भेट घेण्याची पुतिन यांची तयारी शांततेच्या दिशेने एक नवे पाऊल मानले जात आहे. जर युक्रेनच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर लवकरच या दोन देशांमधील संघर्षावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.