* सफारीच्या नोंदणीवरून झाला वाद
चंद्रपूर,
Tadoba-Andhari Tiger Reserve ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी नोंदणीवरून चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या स्वीय सहायक महेश प्रेमलवार यांनी विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांना अर्वाच्च भाषेत फोनवर धमकी दिल्याचा आरोप लावण्यात आला असून, तशी तक्रार शिंदे यांनी क्षेत्र संचालकांकडे केली आहे.
शिंदे यांच्या लेखी तक्रारीनुसार, आ. किर्तीकुमार भांगडिया यांचे स्वीय सहाय्यक महेश प्रेमलवार यांनी, गुरुवारी व्यवस्थापन कोट्यातील सफारी नोंदणीसाठी ताडोबा पर्यटन माहिती केंद्रातील एका महिला कर्मचार्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रेमलवार यांनी, विभागीय वन अधिकारी शिंदे यांना फोनवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे आपल्या नैतिक धैर्यावर परिणाम झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शिंदे यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून, महेश प्रेमलवार यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Tadoba-Andhari Tiger Reserve तक्रारीत त्यांनी महेश प्रेमलवार यांच्यापासून जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली असून, संबंधित ध्वनिफितीही वरिष्ठांकडे सुपूर्द केली आहे. तसेच आ. भांगडिया यांनाही त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या वर्तनाची माहिती देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. व्यवस्थापन कोट्याच्या नोंदणीतून वाढता राजकीय दबाव, धमक्या आणि शिफारशींचा ताण सहन करावा लागत असल्याने संबंधित जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणीही शिंदे यांनी केली.
तक्रार प्राप्त, चौकशी करूः शुक्ल
विभागीय वन अधिकारी शिंदे यांची तक्रार प्राप्त झाली असून, या प्रकरणाची दखल ताडोबा प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करू, अशी माहिती क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ल यांनी दिली.
माझ्यावरील आरोप खोटेः प्रेमलवार
आ. भांगडिया यांच्या सूचनेनुसार, व्यवस्थापन कोट्यातून सफारी नोंदणीच्या शिफारशीचे पत्र पाठविण्यात आले होते. मात्र, शिंदे यांनी त्यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट, वनविभागाच्या महिला कर्मचार्याने मला फोन करून तुम्ही साहेबांना प्रत्यक्ष भेटा असे सांगितले. अनेकवेळा संपर्क करूनही त्यांनी प्रतिउत्तर दिले नाही. आमदारांनी सांगितलेले काम करणे हे माझे कर्तव्य आहे, तर लोकप्रतिनिधींना प्रतिउत्तर देणे हे त्यांचे काम आहे. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया महेश प्रेमलवार यांनी दिली.