चैत्राचा तडाखा ठरतोय तापदायक

    दिनांक :10-May-2026
Total Views |
आपले आरोग्य जपा

विजय आडे
उमरखेड, 
Temperature increase रात्री व पहाटेच्या वेळेतील काहीशा गारव्याचा अपवाद वगळता परिसरात एप्रिल महिन्यात पारा चढला आहे. लोकांची तगमग वाढली आहे. आगामी दोन महिने असेच ‘ताप’दायक राहतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. कमालसह किमान तापमानातही वाढ झाली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या उष्म्याने जीव कासावीस झाला असतानाच सर्दी, तापाचे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे आगामी दोन महिने नागरिकांसाठी तापदायक ठरणार आहेत.
 
 
sun
 
साधारणतः वातावरणात फेब्रुवारीपर्यंत थंडी राहते. त्यानंतर थंडी हळूहळू कमी होत उष्मा सुरू होतो. मार्च, एप्रिल, मे महिन्यात तापमानात वाढ होते. मात्र यंदा फेब्रुवारीतच उष्णता कमालीची वाढली होती. मार्च महिन्यातही उष्म्याने चैत्र, वैशाख वणव्याची आठवण करून दिली होती. मार्च अखेरीस अवकाळी पावसाने प्रथम हजेरी लावली होती. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत असतानाच रात्री अचानक थंडी जाणवत असल्याने लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. किमान तापमान आता 25 अंशावर आले असून कमाल तापमान 38 ते 41 अंशांवर जात आहे.
 
 
 
Temperature increase सद्यस्थितीत ग्रामीण भागात यात्रा हंगाम सुरू असला तरी रणरणत्या उन्हात घराबाहेर न पडणेच अनेकजण पसंत करत आहेत. त्यामुळे यात्रा काळात बहुतांशी ठिकाणी शांतता पाहावयास मिळत आहे. शेतीकाम करतानाही सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत केले जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अनेक ठिकाणी आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. सद्यस्थितीत वातावरणात विलक्षण बदल होत आहेत. सकाळ संध्याकाळ थंड हवा, दुपारी रणरणते ऊन, मध्येच अवकाळी पाऊस या वातावरणाचा विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या दरम्यान सर्वांनी आपल्यासह घरातील वयस्कर मंडळी व लहान बालकांची काळजी घेण्याची गरज आहे.