‘आईच्या आजाराशी झुंज देत मुलाने गाठले यशाचे शिखर’

    दिनांक :10-May-2026
Total Views |
- प्रतिकूल परिस्थितीत विष्णूची ९१.४० टक्क्यांची झेप

नागपूर, 
घरात आई कर्करोगाशी झुंज देत होती. आर्थिक परिस्थिती बेताची होती. एका बाजूला आईची सेवा, तर दुसऱ्या बाजूला दहावीची परीक्षा. मात्र, या सर्व संकटांवर जिद्दीने मात करत रामदास पेठ येथील हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी Vishnu Patel विष्णू पटेल याने दहावीच्या परीक्षेत ९१.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. आईला छातीचा कर्करोग झाल्यानंतर घरातील जबाबदाऱ्या वाढल्या. अशा परिस्थितीत विष्णूने अभ्यासासोबत घरकाम आणि आईची सेवासुश्रुषाही सांभाळली. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्याने संयम आणि आत्मविश्वास सोडला नाही. नियमित शाळेत उपस्थित राहून सातत्यपूर्ण अभ्यास करत त्याने हे यश संपादन केले.
 
vishnu
 
Vishnu Patel  विष्णू आपल्या मोठ्या भावाला, राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रसैनिक कृष्णकुमार याला आदर्श मानतो. “शिक्षकांनी लावलेली शिस्त, योग्य मार्गदर्शन आणि हडस पद्धतीचा अभ्यास यामुळेच मला हे यश मिळाले,” असे विष्णू सांगतो. विज्ञान, गणित आणि संस्कृत या विषयांत त्याने ९० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. वर्गशिक्षिका प्रियंका पुनसे यांच्या मते, विज्ञान विषयातील प्रयोग आणि संशोधनात्मक गोष्टींमध्ये विष्णूला विशेष रुची आहे. वैज्ञानिक बनण्याचे त्याचे स्वप्न असून त्यासाठी तो सातत्याने मेहनत घेत आहे. आईच्या आजाराशी लढताना शिक्षणातही यश मिळवणाऱ्या विष्णूने केवळ गुणांची कमाई केली नाही, तर जिद्द, चिकाटी आणि संघर्षातून यश मिळवण्याचा आदर्शही विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे.