योगी मंत्रिमंडळाचा विस्तार! ६ नवीन मंत्र्यांची एन्ट्री, अखिलेश कडाडले!

    दिनांक :10-May-2026
Total Views |
लखनौ
yogi-cabinet-expansion : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी आपल्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार केला. २०२७ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या या विस्तारात एकूण ८ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. लखनौ येथील जनभवनमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 
yogi-cabinet-expansion
 
 
मंत्रिमंडळात कोणाचे झाले पुनरागमन?
या विस्तारात उत्तर प्रदेश भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी आणि समाजवादी पक्षातून भाजपमध्ये आलेले मनोज कुमार पांडे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. याशिवाय कृष्णा पासवान, सुरेंद्र दिलेर, हंसराज विश्वकर्मा आणि कैलास सिंह राजपूत यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच, अजित सिंह पाल आणि सोमेंद्र तोमर यांची राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून बढती करण्यात आली आहे. या विस्तारामुळे आता योगी मंत्रिमंडळाची सदस्य संख्या ६० झाली असून, ही कमाल मर्यादा आहे.
अखिलेश यादव यांची टीका
या मंत्रिमंडळ विस्तारावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "मंत्रिमंडळात जागा फक्त ६ होत्या, पण दुसऱ्या पक्षातून येणारे लोक त्यापेक्षा जास्त आहेत. मग भाजपसाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, केवळ कमकुवत नेत्यांना मंत्रीपद देऊन भाजप आपली कमजोरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.