गोंदिया,
national-lok-adalat : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील इतर तालुका न्यायालयात तडजोड पात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरण तसेच विद्युत व बँकांसह लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये १३ हजार ६५५ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला असताना ३.६९ कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. प्रतिनिधी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एन. के. वाळके, यांचे मार्गदर्शनाखाली शनिवारी ९ मे रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये तडजोड पात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरण,विद्युत व बँका तसेच लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यावेळी न्यायालयात प्रलंबीत प्रकरणांपैकी ११३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून १ कोटी ९८ लाख ४७ हजार ७१४ रुपयांची वसुली करण्यात आली. त्याचबरोबर पुर्वन्यायप्रविष्ठ ४८ हजार ७४५ प्रकरणांपैकी १३ हजार ५४२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असताना १ कोटी ७१ लाख ३० हजार ८९१ रुपयांची वसुली करण्यात आली. असे ५३ हजार ३०७ प्रकरणापैकी १३ हजार ६५५ प्रकरणे निकाली काढून ३ कोटी ६९ लाख ७८ हजार ६०५ रुपये वसुली करण्यात आली आहे.यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाली असून अनेक पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे.
इतर प्रकरणांचाही निपटारा...
आयोजित लोक अदालतीत स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत जिल्ह्यातील न्यायालयामध्ये एकूण ११२ फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली असता त्यापैकी ९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच १३८४ पेट्टी प्रकरणांपैकी ८९३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.