१८ महिन्यांनंतर बाबा सिद्दीकीप्रकरणात पोलिसावर कारवाई

    दिनांक :11-May-2026
Total Views |
मुंबई,
Action against police in Baba Siddiqui case राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात तब्बल दीड वर्षांनंतर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस हवालदार श्याम सोनवणे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला.१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी श्याम सोनवणे हे त्यांचे अंगरक्षक म्हणून तैनात होते. मात्र हल्ल्यादरम्यान परिस्थिती हाताळण्यात आणि आवश्यक प्रतिसाद देण्यात त्यांनी कसूर केल्याचा आरोप चौकशीत समोर आला. घटनेनंतर काही दिवसांतच त्यांना निलंबित करण्यात आले होते.
 
 
Siddiqui case
 
मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाने केलेल्या विभागीय चौकशीनंतर सोनवणे यांच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. अखेर एप्रिल २०२६ मध्ये त्यांना सेवेतून कमी करण्याचा आदेश जारी करण्यात आला आणि २ मे रोजी त्यांनी तो स्वीकारला. या प्रकरणात गँगस्टर अनमोल बिश्नोई याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले होते. हत्याकांडानंतर पोलिसांनी मोक्का अंतर्गत मोठी कारवाई करत आतापर्यंत २७ आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांना ‘२+१’ स्वरूपाची सुरक्षा देण्यात आली होती. दिवसा दोन आणि रात्री एक पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असायचा. मात्र हल्ल्याच्या दिवशी रात्री एक सुरक्षा रक्षक ड्युटीवरून निघून गेला होता. त्यामुळे हल्ल्याच्या वेळी श्याम सोनवणे हे एकटेच उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.