संतप्त शेतकरी पोहचले तहसीलवर

आता बारदान्याअभावी खरेदी बंद

    दिनांक :11-May-2026
Total Views |
तिवसा,
angry-farmers-reached-the-tehsil : तिवसा तालुक्यात नाफेडमार्फत हरभरा व तूर खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी, खरेदी प्रक्रियेत हलगर्जीपणा करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ त्वरित देण्यात यावा, या मागण्यांसाठी तिवसा तहसीलदार डॉ. मयुर कळसे यांना संतप्त शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
 
 
amt
 
 
निवेदनात प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा होणार्‍या उद्रेकाला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने हरभरा खरेदीसाठी २९ मे तर तूर खरेदीसाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिलेली असतानाही तिवसा तालुक्यातील खरेदी केंद्रावर गेल्या वीस दिवसांपासून खरेदी बंद असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला. खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक दीपक गोफणे यांनी बारदान्याअभावी खरेदी थांबविल्याचे कारण पुढे केले असले, तरी बारदान्याचा साठा संपणार असल्याची माहिती आधीपासून असताना आवश्यक नियोजन का करण्यात आले नाही, असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला.
 
 
या निष्काळजीपणामुळे हजारो शेतकर्‍यांचा माल उघड्यावर पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर ज्वारी खरेदी संदर्भात ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचाही आरोप करण्यात आला. प्रत्यक्ष शेतकर्‍यांचा माल पडून असताना ज्वारीच्या नावावर सुमारे ४०० बनावट ऑनलाइन नोंदण्या कोणी आणि कशा केल्या, याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पीक विमा योजनेबाबतही शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी खरडून गेल्या, शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी नियमित हप्ते भरूनही विमा कंपन्यांकडून अद्याप मदत मिळालेली नाही. यावेळी नगरपंचायत विरोधी पक्षनेते अनिल थूल, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे व अनेक शेतकरी उपस्थित होते.