पाणी टंचाई निवारणासाठी ७४.३९ लाखांच्या उपाययोजनांना मंजुरी

३६ रिचार्ज शाफ्ट व ट्रेंच कामांद्वारे भूजल पुनर्भरणाला चालना

    दिनांक :11-May-2026
Total Views |
वाशीम, 
Approval for water scarcity measures जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता सन २०२५-२६ च्या पाणी टंचाई कृती आराखड्यांतर्गत विविध गावांमध्ये स्रोत बळकटीकरणासाठी रिचार्ज शाफ्ट व रिचार्ज ट्रेंच या उपाययोजनांच्या कामांना अटी व शर्तीच्या आधिन जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामांसाठी एकूण ७४ लाख ३९ हजार ६८८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्ह्यातील १२ गावांमध्ये ३६ उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. भूजल पातळीत सातत्याने होत असलेली घट आणि उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वाशिम यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. वरिष्ठ भुवैज्ञानिक यांनी या कामांची तांत्रिक तपासणी करून अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. तसेच संबंधित तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि वरिष्ठ भुवैज्ञानिक यांनी या उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित करत शिफारस केली होती.
 
 

water scarcit 
 
या अंतर्गत कारंजा तालुक्यातील दुधोरा व बेंबळा, मंगरूळनाथ तालुयातील निंभी व एकांबा, मानोरा तालुयातील भोयनी व वार्डा, मालेगाव तालुयातील चिवरा व दुधाळा, रिसोड तालुयातील वडजी व येवता तसेच वाशीम तालुयातील सावरगाव जिरे व उकळी पेन या गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावात तीन उपाययोजना राबविण्यात येणार असून, प्रत्येक गावासाठी ६ लाख १९ हजार ९७४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामांमध्ये रिचार्ज शाफ्ट आणि रिचार्ज ट्रेंचच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे भविष्यातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार असून विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही कामे दीर्घकालीन जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा थेट लाभ होणार आहे. तसेच पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये शाश्वत जलव्यवस्थापनासाठी अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.