विराटसोबत पंचांशी हुज्जत; कोचला बीसीसीआयची शिक्षा

    दिनांक :11-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
BCCI punishes RCB coach आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. रसिक सलामच्या निर्णायक धावेच्या जोरावर आरसीबीने दोन गडी राखून विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. मात्र या थरारक विजयासोबतच आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यावर झालेल्या कारवाईचीही जोरदार चर्चा रंगली आहे.सामन्यादरम्यान अँडी फ्लॉवर यांनी पंचांशी वाद घालत आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे समोर आले. यानंतर बीसीसीआयने त्यांच्या सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्याचा निर्णय घेतला.
 
 
 
RSB coach
ही घटना आरसीबीच्या डावातील १७व्या षटकात घडली. मुंबईचा गोलंदाज अल्लाह गझनफर गोलंदाजी करत असताना कृणाल पांड्याने लेग साइडला फटका मारला. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या नमन धीरने चेंडू अडवून मैदानात फेकला, मात्र तिलक वर्माकडून चेंडू व्यवस्थित पकडला गेला नाही. आरसीबीच्या खेळाडूंना धाव मिळेल अशी अपेक्षा होती, पण तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहून नमन धीरने नियमांनुसार क्षेत्ररक्षण केल्याचा निर्णय दिला आणि धाव नाकारण्यात आली.
 
 
या निर्णयानंतर अँडी फ्लॉवर संतापले. ते विराट कोहली यांच्यासह चौथ्या पंचांकडे गेले आणि त्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. या वेळी फ्लॉवर यांनी अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचेही समोर आले. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात हा स्तर-१ चा गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून फ्लॉवर यांनी आपली चूक मान्य करत शिक्षा स्वीकारली आहे. दरम्यान, सामन्यात मुंबई इंडियन्सने आरसीबीसमोर १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कृणाल पांड्याने ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. शेवटच्या टप्प्यात भुवनेश्वर कुमारने मारलेला महत्त्वाचा षटकार आणि रसिक सलामने घेतलेली निर्णायक धाव यामुळे आरसीबीने सामना आपल्या नावावर केला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे आव्हान संपुष्टात आले.