अर्जुनी मोरगाव,
bondgaondevi-storm : अर्जुनी मोरगाव तालुक्यात सध्या दिवसभर प्रचंड उकाडा आणि सायंकाळी वादळी वारा व पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. अशातच ९ मे रोजी सायंकाळी बोंडगावदेवी परिसरात आलेल्या जोरदार वादळामुळे परिसरात मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या वादळात बोंडगावदेवी येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेचे संपूर्ण टिनाचे छत उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी लगेच शाळेला भेट देऊन पाहणी केली व संबंधिताना दुरुस्तीचे निर्देश दिले.

बोंडगावदेवी येथील जिल्हा परिषद हायस्कूल ही तालुक्यातील जुनी व ऐतिहासिक शाळा मानली जाते. संबंधित इमारत पूर्वी कौलारू स्वरूपाची होती. नंतर कवेलू काढून लाकडी बांधकामावर टिनाचे छत बसविण्यात आले होते. सुमारे १०५ फूट लांबीच्या या इमारतीमध्ये चार वर्गखोल्यांचा ब्लॉक असून, ९ मे रोजी आलेल्या प्रचंड वादळी वार्यामुळे संपूर्ण टिनाचे छत उडून गेले. त्यामुळे वर्गखोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी १० मे रोजी सकाळीच शाळेला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते, माजी सरपंच राधेश्याम झोळे, पत्रकार अमरचंद ठवरे, मुख्याध्यापक अनिल कापगते, संजय गिर्हपुंजे, के. एस. राऊत, भुमेश्वर लंजे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
पाहणीदरम्यान भेंडारकर यांनी जि.प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकार्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून नुकसानग्रस्त इमारतीच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. वादळामुळे शाळेचे मोठे नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असून, लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.