कल्याणी सोळंकेने केली खोटी सही

    दिनांक :11-May-2026
Total Views |
मुख्याधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला नाही
रजनीकांत बोरेले यांची कार्यवाहीची मागणी

पांढरकवडा, 
Case of false signature प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी पांढरकवडा नगर परिषदचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला असून लोखंडी हातगाडी खरेदी मामल्यात मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून आर्थिक व्यवहार करण्याचा कट त्यांनी उघडकीस आणला आहे. पांढरकवडा नप स्वच्छता विभागासाठी लोखंडी हातगाडीचा पुरवठा करण्याकरिता बनावट नस्ती तयार केली. या प्रकरणात मुख्याधिकारी पंकज गावंडे यांची खोटी सही करून, खोटे कागदपत्र तयार करून खरे म्हणून अंमलात आणून 10,000 रुपये हातगाडीप्रमाणे 3 हातगाडींचे देयक काढले होते.
 

sig 
 
या कथित गैरप्रकारात अभियंंता कल्याणी सोळंके यांना मुख्याधिकारी पंकज गावंडे यांनी 23 जानेवारी 2026 ला कारणे दाखवा नोटीस दिली. त्यात करारनाम्यावर खोटी स्वाक्षरी, कर्तव्यात कसूर, फसवणूक आणि प्रशासनाचा विश्वासघात, सरकारी दस्तावेजावर खोटी सही, अशा फौजदारी गुन्ह्यांबाबत ही नोटीस होता. पंकज गावंडेच्या या नोटिसला कल्याणी सोळंके यांनी 31 जानेवारीला उत्तर देऊन सारे आरोप नाकारले होते. यावर गावंडे यांनी 25 फेब्रुवारीला चौकशी समिती नेमली. यात कल्याणी सोळंके यांनी मुख्याधिकाèयांची बनावट स्वाक्षरी केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले.
 
 
Case of false signature  त्यानंतर स्थापत्य अभियंता शिवांगी राऊत यांच्या नेतृत्वात सखोल चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली. या समितीने नप मुख्याधिकारी पंकज गावंडेंकडे 27 मार्चला अहवाल सादर केला. त्यात नमूद आहे की, 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करून घेतला व 3 नोव्हेंबर 2025 रोजी कामाचा आदेश दिला, असे म्हटले आहे. या चौकशी समितीला प्रथमदर्शनी मुख्याधिकाऱ्यांची सही बनावट असल्याचे आढळून आले आहे. तसेच कंत्राटदार विजय थोरात यांच्याही दोन सह्यांमध्ये तफावत आढळून आली आहे. हा अहवाल मुख्याधिकारी पंकज गावंडे यांना सादर करण्यात आल्यानंतरही अशा गंभीर प्रकरणात मुख्यधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केलेला नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच हस्तक्षेप करून गुन्हा दाखल करावा आणि संबंधितांना अटक करून निलंबित करावे, अशी मागणी रजनीकांत बोरेले यांनी केली आहे.