कोलकाता,
Chandranath Rath murder case पश्चिम बंगालचे भाजापाचे मुख्यामंत्री शुभेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) बिहार आणि उत्तर प्रदेशात छापेमारी करत तीन संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना चौकशीसाठी पश्चिम बंगालमध्ये आणण्यात आले असून, सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.तपासादरम्यान एका आरोपीने टोल प्लाझावर यूपीआयद्वारे पैसे भरल्याची माहिती समोर आली. या व्यवहाराच्या आधारे तपास यंत्रणेला आरोपींचे लोकेशन शोधण्यात मदत झाली आणि त्यानंतर एसटीएफने सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले.

सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी मयंक राज मिश्रा आणि विकी मौर्य हे बिहारमधील बक्सर येथील रहिवासी आहेत, तर राज सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील असून तो सध्या बक्सरमध्ये राहत होता. गुप्त माहितीच्या आधारे १० मे रोजी तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीनंतर आज सकाळी मध्यमग्राम पोलीस ठाण्यात त्यांना औपचारिक अटक करण्यात आली.दरम्यान, ६ मे रोजी रात्री उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. चंद्रनाथ रथ आपल्या वाहनातून प्रवास करत असताना मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर गाडी अडवून अगदी जवळून गोळीबार करण्यात आला. गाडीची काच बंद असतानाही हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात रथ यांचा जागीच मृत्यू झाला होता.