विजय माहुरे
सेलू,
child became a Warkari in Ghorad मोबाईलच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीला भती, संस्कार आणि वारकरी परंपरेची ओळख तब्बल ११ दिवस चाललेल्या या शिबिरात १४० हून अधिक बालकांना करून दिली जात आहे. शहरी भागात विविध स्वीमिंगपासुन खेळ, अभ्यास आणि उन्हाळी प्रशिक्षणात विद्यार्थी गुंतून असताना सेलू तालुक्यातील घोराड येथे मात्र बालकांच्या मनावर हरिनाम कोरल्या जात आहे. येथे हरिपाठ, अभंग, मृदुंग-पखवाज वादन, ज्ञानेश्वरी ओव्या यांसह वारकरी संस्कृतीचे धडे दिल्या जात आहे. बालकांच्या हातातील मोबाईल पाहता जूने दिवस इतिहास जमा होत आहेत. त्यासोबतच घरात सायंकाळी तुळस आणि देवाजवळ दिवा लावून शुभंकरोति ही अपवादानेच घरात होताना दिसुन येते. त्यामुळे गावखेड्यातही बालकांवर करावयाचे संस्कार दूर होताना दिसत असल्याने बालकांना सुसंस्कार मिळावे यासाठी येथील केजाजी मंदिराच्या वतीने मागील वर्षापासून विनामूल्य वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते.
या शिबिरात १४० हून अधिक बालकांनी सहभाग घेतला. यवतमाळ, हिंगणा, तळेगाव पवनार, वर्धा येथील बालकांनी याशिबिरात सहभाग घेतला. बालकांनी हरिपाठ, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी ओव्या, मृदुंग वादन, पखवाज वादन, लाठी काठी, आदी धार्मिक वारकरी विषयाचे शिक्षण घेतले. शेगाव येथील संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात असलेले पांढरे शुभ्र धोतर, बंगाली, पांढरीच टोपी आणि कपाळावर नाम टिळा आणि बुका लावलेले बालवारकरी हातात टाळ घेऊन एक पावली करताता दिसतात. जय जय रामकृष्ण हरीचा गजरात बालवारकरी दंग झाले असतात. तेही या प्रशिक्षणाचा आनंद घेत आहेत. संतोष महाराज जाधव, गणेश महाराज येळुंबे, गणेश महाराज भागवत, यश महाराज गोमासे, विलास महाराज घुमरे, नाना महाराज वालेकर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिराची सांगता शुक्रवार १५ रोजी होणार असून सकाळी १० वाजता मयुर महाराज दरणे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. यानंतर शिबिराला सहकार्य करणार्या दान दात्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिबिरासाठी विठ्ठल रुख्माई देवस्थान ट्रस्टने विनामूल्य सभागृह व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यशस्वतेसाठी डॉ. सुरेंद्र भुते, विजय माहुरे, परसराम गोमासे, हरिभाऊ महाजन, दिलीप पोहाणे, सौरभ पोहाणे,शुभम मुडे, पुरुषोत्तम गुजरकर, आदींनी प्रयत्न केले.
मोबाईलपासून ११ दिवस दूर
विद्यार्थ्यांना भतीरंग, भक्तिरस, अभंग, हरिपाठ कळला. शिबिरातील असंख्य विद्यार्थी तबला वादन, पखवाज याचे काही का होईना पण शिक्षण मिळाले. विशेष म्हणजे ११ दिवसही येथे आलेले बालवारकरी मोबाईलपासुन दूर होते.