मालेगाव,
Child marriage and Poso case तालुक्यातील शिरपूर येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी तसेच संबंधित पोसो प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पीडितेच्या जबाबाच्या आधारे करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील आरोपी आवेज शेख आणि पीडिता यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यानंतर २२ जून २०२५ रोजी शिरपूर येथील उर्दू शाळेच्या परिसरात दोघांचा विवाह लावून देण्यात आला. त्यावेळी पीडितेचे वय अवघे १५ वर्षे १० महिने असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात आरोपी आवेज शेख याच्यासह त्याची आई मदीनाबी, वडील शेख परवेज रा. शिरपूर तसेच पीडितेचे आई-वडील फरजाना आणि शेख आयुब रा. बुरहानपूर (मध्यप्रदेश) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांनी मिळून बालविवाह लावून दिल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिचा पती तिला जिल्हा महिला रुग्णालय, वाशीम येथे घेऊन गेला. तेथे ७ मे रोजी तिने एका बालकाला जन्म दिला. त्यावेळी तिचे वय १६ वर्षे २ महिने होते. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर १० मे रोजी पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२१/२०२६ दाखल करण्यात आला. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२) सह पोसो कायदा तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे. ठाणेदार केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे पुढील तपास करीत आहेत.