बीजिंग,
Chinese soldiers were killed in Galwan गलवान खोऱ्यात २०२० मध्ये झालेल्या भारत-चीन संघर्षाच्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये एक भावनिक घटना घडली असून, गलवान संघर्षात मृत्यू झालेल्या चिनी सैनिकांच्या मातांनी बीजिंगमधील लष्करी संग्रहालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या मुलांच्या प्रतिमांना स्पर्श करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या भावनिक क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या चिनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गलवान संघर्षात मृत्यू झालेल्या चेन शियांगराँग, शिओ सियुआन आणि वांग झुरान या सैनिकांच्या मातांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी स्मरणिकांमध्ये आपल्या भावना लिहून मुलांच्या शौर्याचा उल्लेख केला. या दृश्यांमुळे १५ जून २०२० रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात घडलेल्या रक्तरंजित संघर्षाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

त्या संघर्षात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली होती. भारताने अधिकृतपणे २० जवान हुतात्मा झाल्याचे जाहीर केले होते. मात्र चीनने सुरुवातीला आपल्या सैनिकांच्या मृत्यूबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. नंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये चीनने पहिल्यांदाच चार सैनिक मारले गेल्याची कबुली दिली. मात्र विविध आंतरराष्ट्रीय अहवालांमध्ये चिनी सैनिकांच्या मृत्यूचा आकडा यापेक्षा खूप जास्त असल्याचे म्हटले गेले. काही अहवालांमध्ये ३८ ते ४० सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान युद्ध किंवा सीमावादातील मृत्यूंबाबत चीनने नेहमीच मर्यादित माहिती देण्याचे धोरण स्वीकारले आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धापासून ते १९६७ च्या नाथू ला संघर्षापर्यंत अशाच प्रकारे चीनने मृतांच्या आकड्यांबाबत मौन राखल्याची उदाहरणे आहेत. गलवान संघर्षातही चीनने त्याच पद्धतीचा अवलंब केल्याचे मानले जाते.