वर्धा,
Commendable initiative of NCC unit आपण कधीही दुसर्या देशावर आक्रमण केलेले नाही किंवा शत्रुत्व सुद्धा ठेवले नाही हा आपल्या देशाचा मूळ स्वभाव आहे. पण, जेव्हा देशावर संकट आले तेव्हा आपण शत्रूला आपली ताकत सुद्धा दाखवलेली आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे नव्या भारताची ताकत, सैन्य दलाचे समर्पण व देशभती होय, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस यांनी केले. स्थानिक यशवंत महाविद्यालयाच्या सभागृहात २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत देवळीच्या एसएसएनजे महाविद्यालयातील एनसीसी युनिटच्या वतीने १० रोजी आयोजित ‘ऑपरेशन सिंदूर वर्षगाठ’ कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमान अधिकारी कर्नल एस. के. सिंग, विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, सुबेदार मेजर टुला सिंग, एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

ऑपरेशन सिंदूर विजय दिन समारंभाची सुरुवात भारतीय सैन्य दलातील हुतात्म्यांना पुष्पचक्र प्रदान करून झाली. यानिमित्त ‘ऑपरेशन सिंदूर-भारताचा अभिमान’ या विषयावर वतृत्व स्पर्धा व पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वतृत्व स्पर्धेत मंथन वानखेडे, कॅडेट आरती मरघडे व कॅडेट फौजिया खान यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके पटकावली. तर हृदया कोहचाडे, काजल वैद्य, सलोनी अजमीरे व सिमरन नट यांना प्रोत्साहनपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पोस्टर मेकिंग स्पर्धेत सार्जंट वैष्णवी कन्नाके, दिव्याणी विरूळकर व साक्षी पारिसे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार तर प्रोत्साहनपर पुरस्काराने वेदश्री कामडी, रश्मी मडावी व पूर्वा कापटे यांना सन्मानित करण्यात आले. नागपूर विभाग स्तरावर निशानेबाजी स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल कॅडेट यामिनी पारधी हिला यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी एनसीसीचे कमांडंट कर्नल एस. के. सिंग यांनी देशभतीची भावना लहानपणापासूनच मुला-मुलींच्या मनात निर्माण करण्याचे काम शाळा, महाविद्यालयातच होऊ शकते. या दृष्टिकोनातून एनसीसीचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले. संचालन अंडर ऑफिसर कोमल शितळे व सीनियर अंडर ऑफिसर कल्याणी लिखार यांनी तर अंडर ऑफिसर रितेश बुटे याने आभार मानले.