चेन्नई,
Controversy on Vijay government तामिळनाडूमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच सत्ताधारी आघाडीत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. अभिनेता-राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देणाऱ्या थोल, थिरुमावलवन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या शपथविधी सोहळ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शपथविधी कार्यक्रमात सर्वप्रथम ‘वंदे मातरम’ वाजवण्यात आल्याने थिरुमावलवन यांनी नाराजी व्यक्त केली. तामिळनाडूमधील सरकारी कार्यक्रमांमध्ये परंपरेनुसार सुरुवात ‘तामिळ थाई वलथू’ने केली जाते, मात्र या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’, त्यानंतर राष्ट्रगीत आणि शेवटी ‘तामिळ थाई वलथू’ सादर करण्यात आले, यावर त्यांनी आक्षेप घेतला. हा निर्णय राज्यपालांच्या इच्छेनुसार झाला की त्यांना खूश करण्यासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

थिरुमावलवन यांनी ‘वंदे मातरम’ला धार्मिक छटा असल्याचा आरोप करत अशा गीताला शासकीय कार्यक्रमात प्राधान्य देणे चिंताजनक असल्याचे म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, या कृतीमुळे टीव्हीकेला पाठिंबा देणाऱ्या अनेक मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री विजय यांनी भविष्यातही अशीच पद्धत कायम ठेवली जाणार आहे का, याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री विजय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मागील सरकारवर जोरदार टीका करत तामिळनाडूवर १० लाख कोटी रुपयांचे कर्ज लादल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना थिरुमावलवन यांनी केवळ मोठे आकडे सांगून जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले.
राज्याच्या अर्थस्थितीचे मूल्यांकन हे सकल राज्य उत्पादनाच्या प्रमाणात केले पाहिजे आणि तामिळनाडूचे कर्ज अद्याप वित्त आयोगाने निश्चित केलेल्या मर्यादेत असल्याचा दावा त्यांनी केला. तथापि, विजय सरकारच्या काही निर्णयांचे त्यांनी स्वागतही केले. व्यसनमुक्ती अभियान, महिला सुरक्षेसाठी उपाययोजना आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीज या घोषणांचे कौतुक करत त्यांनी सरकारने धर्मनिरपेक्ष भूमिकेवर ठाम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘बदल’च्या घोषणेसह सत्तेत आलेल्या सरकारने आता आपल्या भूमिकांबाबत स्पष्टता द्यावी, जेणेकरून जनतेच्या आणि मित्रपक्षांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असेही त्यांनी नमूद केले.