कारंजा (घा.),
Creation of Gram Panchayat in Khairi खैरी पुनर्वसन कारनदी प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी १ मे हा दिवस ऐतिहासिक ठरला. या दिवशी प्रथमच आपल्या हकाच्या ग्रामपंचायत इमारतीत तब्बल २५ वर्षांच्या संघर्षानंतर सर्वांच्या साक्षीने ध्वजारोहण झाले. कार नदी प्रकल्पामुळे सन २००० मध्ये खैरी हे गाव बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे येथील गावकर्यांचे पुनर्वसन कारंजा येथील येनगाव मार्गावर खैरी पुनर्वसन येथे करण्यात आले. हे जवळपास ७०० लोकसंख्येचे गाव. पुनर्वसन झाल्यापासून स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी गावकर्यांनी संघर्ष सुरू केला होता. गेल्या २५ वर्षांत अनेक आंदोलने, उपोषणं, निवेदनं देत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला. पण, यश आले नव्हते. या दीर्घ आणि कठीण संघर्षात अनेकवेळा निराशा, अडथळे आले. पण, गावकर्यांनी हार मानली नव्हती. कार नदी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची स्थापना करून त्या माध्यमातून यश मिळेपर्यंत या समितीचे अध्यक्ष एकनाथ डोबले व सचिव संजय पाठे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी संघर्ष केला. सर्वांच्या एकजुटीने आणि चिकाटीने अखेर हा लढा यशस्वी झाला. या गावाचा समावेश पूर्वी जऊरवाडा या ग्रामपंचायतमध्ये होता.
नवीन ग्रामपंचायत निर्मितीकरिता त्या ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव संजय यावले यांनी पाठपुरावा केला. प्रशासकीय कारवाई जलदगतीने व्हावी, यासाठी प्रयत्न केले. २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून ग्रामसभा घेऊन नवीन ग्रामपंचायतच्या कार्यालयीन कामाला सुरूवात करण्यात आली. या दिवशी खैरी पुनर्वसन गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकृतपणे सुरू करण्यात आली. हा विजय कुणाच्या कृपेने नसून, गावकर्यांच्या संघर्ष, त्याग आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे. या लढ्यात सहभागी सर्व ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि नेतृत्त्वाचे विशेष योगदान राहिले आहे. नवीन ग्रामपंचायतीमुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक सक्षम होणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यत करण्यात येत आहे. या यशासाठी सर्व ग्रामस्थ, आंदोलनात सहभागी कार्यकर्ते, तसेच प्रशासनातील संबंधित अधिकारी यांचे गावाकर्यांनी आभार मानले. या नवनिर्मित ग्रामपंचायतचा कारभार सध्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सुनील भजन तर प्रशासक म्हणून कैलास वानखेडे हे पाहत आहेत. आता पुढील काळात खैरी पुनर्वसन गावाला आदर्श ग्रामपंचायत बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार केला आहे.