नवी दिल्ली,
sleeping time आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळणे अनेकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. अनेकदा लोक ८ तास झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर थकवा, आळस किंवा शरीरात जडपणा जाणवत असल्याची तक्रार करतात. दिवसभर सुस्ती जाणवणे, कामात लक्ष न लागणे किंवा चिडचिड होणे यामागे केवळ झोपेचा कालावधीच नव्हे, तर झोपेची गुणवत्ता देखील महत्त्वाची असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, “दररोज ८ तास झोप” हा फक्त एक सरासरी अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज, वय, जीवनशैली आणि आरोग्य यानुसार झोपेचे प्रमाण बदलते. त्यामुळे प्रत्येकासाठी एकच नियम लागू होऊ शकत नाही. चांगल्या झोपेचं विज्ञान समजून घेणं आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं मानलं जातं.
नॅशनल स्लीप फौंडेशन यांच्या मते, झोपेची गरज वयानुसार बदलते. नवजात बाळांना दिवसातून १४ ते १७ तास झोप आवश्यक असते. ६ ते १३ वर्षांच्या मुलांसाठी ९ ते ११ तास झोप महत्त्वाची मानली जाते. १४ ते १७ वर्षांच्या किशोरवयीन मुलांना ८ ते १० तास झोप आवश्यक असते. १८ ते ६४ वर्षांच्या प्रौढ व्यक्तींनी ७ ते ९ तास झोप घेणे आदर्श मानले जाते, तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ७ ते ८ तास झोप पुरेशी मानली जाते.
तज्ज्ञांच्या मते, झोपेची वेळ महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा गाढ आणि शांत झोप अधिक महत्त्वाची असते. अनेक लोक ८ तास बेडवर पडून राहतात, पण त्यांना व्यवस्थित झोप लागत नाही. वारंवार जाग येणे, अस्वस्थ वाटणे किंवा सतत विचार सुरू राहणे यामुळे शरीराला आवश्यक विश्रांती मिळत नाही. गाढ झोपेमध्येच शरीराची दुरुस्ती प्रक्रिया व्यवस्थित होते, मेंदू शांत होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सतत ६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास हृदयरोग, लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह आणि नैराश्यासारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. कमी झोपेमुळे एकाग्रता कमी होते आणि स्वभावात चिडचिडेपणाही वाढतो. दुसरीकडे, १० ते ११ तासांपेक्षा जास्त झोप घेणेही आरोग्यासाठी योग्य नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. अतिजास्त झोपेमुळे डोकेदुखी, सुस्ती आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.
आरोग्यदायी आणि शांत झोपेसाठी काही साध्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. दररोज ठराविक वेळी झोपणे आणि उठणे, झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीपासून दूर राहणे, रात्री चहा-कॉफी किंवा जड अन्न टाळणे आणि झोपताना खोलीत शांतता व अंधार ठेवणे यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.sleeping time तज्ज्ञांच्या मते, सकाळी अलार्मशिवाय ताजेतवाने उठणे आणि दिवसभर ऊर्जा जाणवणे हे चांगल्या झोपेचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. त्यामुळे केवळ झोपेचे तास मोजण्यापेक्षा शरीराला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळते आहे का, हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.