नवी दिल्ली,
Don't worry about petrol and diesel पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आर्थिक अस्थिरता आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय किमतींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाचा विवेकपूर्ण वापर करण्याचे आवाहन केल्यानंतर केंद्र सरकारने दुसऱ्याच दिवशी याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी किंवा कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. आंतर-मंत्रालयीन गटाच्या (IGoM) बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की भारताकडे सध्या पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे. देशात सुमारे ६० दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा, ६० दिवसांचा नैसर्गिक वायूचा साठा आणि ४५ दिवसांचा एलपीजी साठा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घबराट बाळगण्याची गरज नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकारी निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की भारत हा जगातील मोठ्या तेल शुद्धीकरण देशांपैकी एक असून, अनेक देशांना पेट्रोलियम उत्पादने निर्यात करतो. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याची क्षमता भारताकडे आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक दबाव वाढत असल्याचेही मान्य करण्यात आले आहे.सरकारच्या मते, इंधनाची बचत ही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची असून, त्यामुळे परकीय चलन वाचवण्यास मदत होऊ शकते. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा उद्देश जनतेचा सहभाग वाढवून देशावरील आर्थिक भार कमी करणे हा आहे. दरम्यान, तेल कंपन्यांना काही प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही सरकारने ठामपणे सांगितले आहे की देशात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही आणि नागरिकांनी बाजारात गर्दी करण्याची आवश्यकता नाही.